धान खरेदी केंद्रावर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड

By admin | Published: November 24, 2015 12:35 AM2015-11-24T00:35:32+5:302015-11-24T00:35:32+5:30

लाखनी परिसरातील शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव मिळावा, यासाठी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

Board of HouseFulls at Paddy Purchase Center | धान खरेदी केंद्रावर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड

धान खरेदी केंद्रावर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड

Next

शेतकऱ्यांची कोंडी : जागेअभावी खरेदी प्रक्रिया रखडली'
मुखरू बागडे पालांदूर
लाखनी परिसरातील शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव मिळावा, यासाठी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तीन दिवसात केंद्रावर धानाची आवक वाढल्यामुळे धान खरेदी केंद्रातील जागा धानाने व्यापल्यामुळे मार्केटींग फेडरेशनने शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धान आणू नये, यासाठी केंद्र ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचा फलक प्रवेशद्वारावर लावला आहे.
लाखनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. या धानाला खुल्या बाजारात विकताना व्यापाऱ्यांकडून आर्थिक कुचंबना होवू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून पालांदूर येथे सेवा सहकारी संस्थेच्या सहकार्याने धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. १९ नोव्हेंबरला धान खरेदी केंद्र सुरू केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी आणले. मागील तीन दिवसात १६ शेतकऱ्यांकडून ५५६.२० क्विंटल धानाची खरेदी फेडरेशनने केली आहे. यासोबतच अन्य धान खरेदी इच्छुक शेतकऱ्यांचे धान केंद्रावर आले असता त्यांचे धान्य घेवून त्यांना टोकन देण्यात आले आहे. टोकन दिलेल्या धान्याची मोजणी व्हायची असल्याने केंद्राच्या परिसरात धान्याचा मोठ्या प्रमाणात साठा अस्ताव्यस्त पडलेला आहे. यामुळे धान खरेदी केंद्रावर येणाऱ्या नवीन शेतकऱ्यांच्या धान्यासाठी जागेचा अभाव जाणवू लागला आहे.
मोठ्या प्रमाणात धान्याची आवक केंद्रावर वाढली असताना त्या तुलनेत केंद्राकडून आलेल्या धान्यांची मोजणी धीम्या गतीने सुरू आहे. सोबतच खरेदी केंद्राची संख्याही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये त्यांचे धान्य मोजण्यासाठी चढाओढ लावित असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान्य मोजणी व्हायचे असल्याने शेतकऱ्यांना रोज मोजणीअभावी घरी परतावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील जेवनाळा, खराशी, किटाळी, देवरी (गोंदी), मऱ्हेगाव, खुनारी आदी गावात धान खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासोबतच प्रती हेक्टर २० क्विंटल धान्याची खरेदी मर्यादा वाढवून देणे शेतकऱ्यांच्या हिताची असल्याची मागणी होत आहे. व्यापाऱ्यांकडून आर्थिक कुचंबना होत असल्याने अनेकांनी खरेदी केंद्रावर धान्य विक्रीसाठी आणण्याचा पुढाकार घेतला आहे.
धान्य विक्रीसाठी येत असताना फेडरेशनने त्यांच्याकडे असलेल्या गोडावून व्यतिरिक्त जागेची उपाययोजना अगोदरच करणे गरजेचे होते. मात्र गोडावूनची व्यवस्था करण्यात आली नसल्याने ही समस्या आवासून उभी आहे. फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी होत असलेल्या धान्याला योग्य मोबदला मिळत असल्याने शेतकरी धान खरेदी केंद्राकडे धान विक्रीसाठी वळला आहे. मात्र जागेअभावी फेडरेशनची कोंढी होत असल्याने त्यांनी केंद्राच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांना नवीन धान्य आणण्यासाठी अटकाव करण्यासंबंधी फलक लावला आहे. यामुळे येथे विक्रीसाठी धान्य आणणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

Web Title: Board of HouseFulls at Paddy Purchase Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.