रिचार्ज शॉफ्टद्वारे पुनर्भरणासाठी तलावात खोदल्या बोअरवेल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:11 PM2018-05-27T22:11:38+5:302018-05-27T22:11:38+5:30
सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा येथे खालावलेल्या भूजलपातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने हुडकी तलावात रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले.
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा येथे खालावलेल्या भूजलपातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने हुडकी तलावात रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले. सदर कामांचे तांत्रिक मार्गदर्शन वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांनी केले असून यावर ३,९९,०१० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात तलावात साठलेले पाणी बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात मुरुम पाण्याची पातळी वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मोहाडी तालुक्यातील करडी परिसराला निसर्गाचा शाप आहे. वैनगंगा नदी जवळून वाहत असताना तसेच कोका वन्यजीव अभयारण्य व न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल सभोवताल असताना भूगर्भात पाण्याचा ठणठणाट आहे. जानेवारीतच बोअरवेल्स व विहिरी कोरड्या पडतात. पावसाळ्यात डोंगर टेकड्यांवरून ओसंडून वाहणारे पावसाचे पाणी अडवून साठविण्यासाठी टेकड्यांच्या पायथ्यांशी मोठ्या प्रमाणात लहान तलाव - बोड्या आहेत. मात्र, त्यांची दूरवस्था आहे. तलाव गाळाने बुजलेली आहेत. अतिक्रमणामुळे तलावांचा श्वास अवरुद्ध आहे. त्यामुळे खरीपातील पिकांनाही येथीलु पाण्याचा पुरेशा फायदा होत नाही. पडलेले पावसाचे पाणी सरळ शेती, नाले, ओढ्यांतून वाहून जाते. मागील चार वर्षांपासून खरीपातील दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाठीला पुजलेला आहे. अल्प पावसामुळे हजारो एकर शेती पडीत राहून त्यासाठी केलेला खर्च वाया जात आहे. त्यावर उपाय म्हणून करडी परिसरात पाणी अडविणारी, जिरविणारी व मुरविणारी पुनर्भरण यंत्रणा कार्यान्वित होण्याची आवश्यकता होती.
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे काही प्रमाणात का होईना चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. विविध विभागांचे माध्यमातून तलाव, नाले खोलीकरणाचे काम जोमाने सुरु आहेत. ठिकठिकाणी बंधारे बांधले जात असून तुटलेल्या बंधाºयांच्या दुरुस्त्या युद्ध पातळीवर आहेत. वनविभागाद्वारे वृक्षारोपण व पाणी अडविण्यासाठी समतल चरे खोदकाम, शेतबोड्या, शेततळे, सिंचन विहिरी आदिंच्या कामाचा सपाटा आहे. भूजल पातळीत वाढ होण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पालोरा येथे हुडकी तलावात ग्रामपंचायत पालोराचे सहकार्याने रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांनी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने केले. यावर ३,९९,०१० रुपयांचा खर्च करण्यात आला. तलावात साठवलेले पाणी बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात मुरुम पाण्याची पातळी वाढेल, असा विश्वास विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.
कोरडवाहू पालोरा परिसरातील हा नाविण्यपूर्ण प्रयोग आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांच्या कार्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून सिंचन विहिरी व बोअरवेल्स यांना त्याचा फायदा होणार आहे.
-महादेव बुरडे, सरपंच, ग्रामपंचायत, पालोरा.