मृतदेहासह जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:00 AM2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:15+5:30
भंडारा शहरातील खात रोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र खांबतलाव परिसरात गत सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठाले खड्डे निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी तकीया वॉर्डातील प्रशांत नानाजी नवखरे (३६) हा राजीव गांधी चौकाकडे जात होता. त्यावेळी खड्डा चुकविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि अंगावरुन एसटी बस गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काम खोळंबलेल्या रस्त्यावरील खड्ड्याने झालेल्या अपघातात तरुणाचा बळी गेल्याचा आरोप करीत शेकडो नागरिकांनी सोमवारी दुपारी १२ वाजता मृतदेहासह येथील जिल्हा कचेरीवर धडक दिली. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलीस व प्रशासनाची एकच धावपळ उडाली. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले मात्र तोपर्यंत जिल्हा कचेरीसमोर वातावरण चांगलेच तापले होते.
भंडारा शहरातील खात रोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र खांबतलाव परिसरात गत सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठाले खड्डे निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी तकीया वॉर्डातील प्रशांत नानाजी नवखरे (३६) हा राजीव गांधी चौकाकडे जात होता. त्यावेळी खड्डा चुकविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि अंगावरुन एसटी बस गेली. त्यात तो जागीच ठार झाला. त्याच्या मृत्यूला े खड्डेच जबाबदार असल्याचा आरोप करी शवविच्छेदनानंतर तरुणांच्या नातेवाईकांसह अन्य नागरिकांनी शववाहिनीतून मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला. राष्ट्रीय महामार्गावर अचानक आलेल्या या आंदोलनाने वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ धाव घेवून अवघ्या काही वेळातच हा रस्ता सुरळीत केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, भंडारा शहरचे ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले. यावेळी चर्चेत माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, राष्टÑवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, मृत प्रशांत यांचे वडील नानाजी नवखरे, यशवंत सोनकुसरे, नितीन धकाते आदी सहभागी झाले होते.
शहरातील अंतर्गत रस्त्यांचे प्रचंड हाल झाले आहे. त्यातच शितलामाता मंदिर ते खांब तलाव हा रस्ता जीवघेणा झाला आहे. बांधकाम ठप्प् असल्याने या मार्गावर खड्डे पडले आहे. आतापर्यंत अनेक अपघात येथे झाले असून प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही. रविवारी भंडारा शहरात झालेल्या अपघाताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आता या रस्त्याचे बांधकाम केव्हा सुरु होते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
अपघातात मृत पावलेल्या प्रशांत नवखरे यांच्या पत्नीला नोकरी, शासनातर्फे ५० लाखांच्या मदतीचा शासनाकडे प्रस्ताव व या बाबीला जबाबदार असलेल्या अधिकाºयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच सदर रस्ताची तात्काळ डागडुजी करण्याचे निर्देश ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता चेपे यांना दिले.
तासभरानंतर सुटली कोंडी
शवविच्छेदनानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास प्रशांत नवखरे यांच्या मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आला. तोपर्यंत पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. संतप्त झालेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासन व महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांविरुध्द घोषणा दिली. जोपर्यंत अधिकारी मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत मृतदेह येथून हलविणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. दरम्यान तब्बल एक तासाने मागण्यांसंदर्भात कोंडी सुटली.