अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:00 AM2019-07-13T01:00:45+5:302019-07-13T01:01:57+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या एका युवकाचा मृतदेह तुमसरजवळील खापा काटेबाम्हणी रस्त्याच्या कडेला आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली. आशिष सुरेश पावडे (२१) रा. राजूरा (जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या एका युवकाचा मृतदेह तुमसरजवळील खापा काटेबाम्हणी रस्त्याच्या कडेला आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली.
आशिष सुरेश पावडे (२१) रा. राजूरा (जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आशिष हा रामटेक येथील किट्स अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. दरम्यान माझ्या मुलाची हत्या करण्यात असा आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे. त्याचा मृतदेह तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गाजवळ हाकेच्या अंतरावरील काटेबाम्हणी-खापा रस्त्याच्या कडेला गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आढळला. तुमसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर प्रकरणाचा उलगडा होईल, असे सांगण्यात आले.
आशिषचे वडील तुमसरात शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे, असे सांगितले. रामटेके ते तुमसर अंतर मोठे आहे. तुमसरशी त्याचा काहीच संबंध नाही. तो इकडे येवूच शकत नाही. येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरेश पावडे यांनी केली आहे.
गुरूवारी सकाळी वडील सुरेश पावडे यांनी आशिषला फोन केला होता, परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याच्या आईने व लहान भावानेही भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी २ वाजताच्या सुमारास त्याचा मोबाईल स्वीच आॅफ दाखवित होता. आशिषच्या बँक खात्यात ५५ हजार रूपये काही दिवसापुर्वी घातले होते. मृत्युसमयी त्याच्या खिशात सात ते आठ हजार रूपये होते. त्याची हत्या इतरत्र करून त्याचा मृतदेह काटेबाम्हणी शिवारात फेकून देण्यात आला, असा कयास आहे.