नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेहच आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:41+5:302021-09-19T04:36:41+5:30
माेहित ऊर्फ पद्माकर नरेंद्र दोनोडे (वय १६, रा. लोहारा) असे मृताचे नाव आहे. तो शुक्रवारी आपला चुलत भाऊ ज्ञानेश्वर ...
माेहित ऊर्फ पद्माकर नरेंद्र दोनोडे (वय १६, रा. लोहारा) असे मृताचे नाव आहे. तो शुक्रवारी आपला चुलत भाऊ ज्ञानेश्वर दोनोडे याच्या सोबत गुरे चारण्यासाठी गेला होता. गुरे नदीपात्रातील बेटावर गेल्याने त्यांना आणण्यासाठी तो नदीच्या पात्रात उतरला. मात्र, पाेहता येत नसल्याने तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. त्यावेळी ज्ञानेश्वरने त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतु, यश मिळाले नाही. लगेच गाव गाठत त्याने या घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी नदी तीरावर धाव घेतली. त्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले. रात्री ९ वाजेपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यश आले नाही. शनिवारी पहाटेपासूनच पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून बोट मिळाली. नदीपात्रात शोधाशोध सुरू झाली. सुमारे पाच ते दहा किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. मात्र, मोहितचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर दिघोरीचे शंकर गणपत मेश्राम व संजय दामा मेश्राम या पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना पाचारण करण्यात आले. तेव्हा काही वेळातच घटनास्थळापासून केवळ २०० मीटर अंतरावर मोहितचा मृतदेह आढळून आला.
या शोधमाेहिमेत नायब तहसीलदार बेनीलाल मडावी, पालांदूरचे ठाणेदार तेजस सावंत, मंडळ अधिकारी राकेश पंधरे, तलाठी सुनील कासराळे, पोलीस शिपाई नावेद पठाण, तालुका समन्वयक नरेश नवखरे यांनी भाग घेतला. मोहितच्या मृत्यूने लोहार येथे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.