बोगस बियाणे बाजारात येणार!
By admin | Published: June 3, 2015 12:43 AM2015-06-03T00:43:26+5:302015-06-03T00:43:26+5:30
जगाच्या स्पर्धेत शेतकरीही सहभागी झाल्याने रेडीमेड बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
पालांदूर : जगाच्या स्पर्धेत शेतकरीही सहभागी झाल्याने रेडीमेड बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कंपन्यांनीही शेतकऱ्यांची कमजोरी व अज्ञानाचा लाभ उठवत दरवर्षी डझनभर नवीन वाण आणून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. जिल्ह्यात धान बियाणे कृषीकेंद्रात आले असून विक्रीकरीता उपलब्ध लवकरच होणार आहेत. यात बोगस बियाणे असण्याची चिन्हे अधिक आहेत.
धानाचा एक वाण तयार करण्याकरीता, शोधण्याकरीता सुमारे दहा ते बारा वर्ष लागतात. मात्र बाजारात दरवर्षी नवनवीन वाण आणून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते.
वाण/जात एकच असते. फक्त पॅकींग व कंपनीचे नाव बदलवून अधिक नफा कमविण्याच्या लालसेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जातात. दोन वर्षापूर्वी खराशी व पालांदूर परिसरात अशाच एका नामवंत कंपनीचे आरपीएन जातीचे वाण बोगगस निघाले.
साठ टक्क्याच्या वर भेसळ बियाणे असल्याने निसण्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पन्न नाहीच्या बरोबर आले. तक्रार झाली, चौकशी आटोपली पण अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने कंपनी मोकळी सुटली. कालपरवा पर्यंत कर्तव्यनिष्ठ समजले जाणारे कृषी विभागाचे अधिकारीही प्रवाहासोबत राहून शेतकऱ्यांवर अन्याय करतात. रब्बीतही याच कंपनीचे बियाणे धोकादायक ठरतात. धान निसवल्यावर असताना काही गर्भात, काही पूर्णपणे फुललेला तर काही पूर्णपणे भरलेला असतो. एकावेळी पूर्ण धान कापणीला येत नाही. यामुळे कालावधी निश्चिततेपेक्षा अधिक राहतो. यामुळे हंगाम धोक्यात येऊन नुकसानीची भिती अधिक असते. (वार्ताहर)
शक्यतो घरचे बियाणे वापरा
शेतकऱ्यांनो, नफा-तोटा लक्षात घेऊन शेती करणे अगत्याचे आहे. ९०-१२५ रुपये प्रति किलो भावाचे धान बियाणे खरेदी करण्यापेक्षा घरचेच वाण योग्य काळजीने ठेवले तर दरवर्षी नवीन बियाणे घेणे गरजेचे राहणार नाही. आपली शेती परावलंबी करु नका. बियाणे स्वत: शोधा, तयार करा व स्वत:च पुढे येऊन नवीन काहीतरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. जुने ते सोने म्हणत यातूनच नवीन वाणाची निर्मिती होते तसा प्रयोग स्वत:पासून तयार करा. याकरीता शासनाची कृषी विभागाकडून माहिती पुरविली जाते. जुने घरचेच वाण बियाणे म्हणून वापरताना साधी घरच्याघरी प्रक्रिया करुन बियाणे वापरु शकता.