कोरोना आल्यापासून दोन-दोन दिवस बोहणीही होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:58+5:30
कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : साहेब कोरोना आला तेव्हापासून दोन-दोन दिवस साधी बोहणीही होत नाही. ३२ वर्षापासून भंडारात सायकलरिक्षा चालवतो. पण असे कठीण दिवस कधी बघितले नाही. पूर्वी रोज ५००-६०० रुपये घरी घेऊन जायचो. पण कोरोनापासून १००-२०० ही मुश्कीलीने हातात पडतात. सरकारी धान्य मिळत असल्याने कशीतरी गुजराण सुरु आहे. असे रिक्षाचालक माणिक शहारे आपली व्यथा सांगत होते.
कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.
लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. भंडारा शहरात ३२ वर्षापासून रिक्षा चालविणारे राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील रहिवासी माणिक शहारे यांनी आपबिती सांगितली, तेव्हा अंगावर अक्षरश: शहारे आले. आधीच सायकलरिक्षात बसणे सुशिक्षितांना कमीपणाचे वाटते. मात्र मुलांना शाळेत सोडणे आणि मालवाहतुकीतून घरखर्च भागायचा. परंतु आता लॉकडाऊनने आमचे सर्वस्वच गमावून बसलो आहे. तीन-तीन दिवस साधी बोहणीही होत नाही. घरी पैसे नेले नाही तर कुटूंब कसे चालवायचे? असा सवाल ते करतात.
नवीन टाकळी परिसरातील दिगंबर गायधने २७ वर्षापासून भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवितात. आपल्या उभ्या आयुष्यात असे संकट कधीच अनुभवले नाही. एकही दिवस असा गेला नाही की आपण रिकाम्या हाताने घरी गेलो. मात्र कोरोना पासून दिवसभर भटकूनही हातात एक रुपयाही मिळत नाही. घरखर्च चालवावा कसा असा प्रश्न असल्याचे ते सांगतात. अशीच अवस्था शहरातील इतरही रिक्षाचालकांची आहे. शासनाने दिलेले धान्य आणि स्वयंसेवी संस्थाकडून मिळालेल्या मदतीवर गुजराण सुरु आहे. परंतु कोण किती दिवस देणार. एकदाचा हा कोरोना संपला पाहिजे, असे दिगंबर आणि माणिक यांनी सांगितले.
कोरोनाचा फटका
भंडारा शहरात ५० च्या आसपास सायकलरिक्षा चालक आहेत. २० वर्षापूर्वी शहरात रिक्षांची संख्या तीन हजारांच्या घरात होती. मात्र आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत. लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.
सायकलरिक्षाला दिवस वाईट
भंडारा शहरात सवारीचे हमखास साधन म्हणजे सायकलरिक्षा. अनेकांनी सायकलरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढला. परंतु आॅटोरिक्षा आणि मोटारसायकलची संख्या वाढली आणि सायकलरिक्षाला वाईट दिवस आले. सुशिक्षित व्यक्ती सायकलरिक्षात बसायला मागेपुढे पाहतात. भाड्यासाठी अनेकदा घासाघीस करतात. गत दहा वर्षापासून सायकलरिक्षाला भंडारा शहरात तरी वाईट दिवस आले. त्यामुळे आता अनेक जण मुलांना शाळेत पोहचून देणे आणि दिवसभर सायकलरिक्षाची मालगाडी करून दुकानातील साहित्य इकडून तिकडे रोजीरोटी कमावतात.