बोंडे ते जिरोला रस्ता सकाळी होतो उंच अन् सायंकाळी पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:50 PM2019-05-30T21:50:01+5:302019-05-30T21:50:24+5:30
एखादा रस्ता सकाळी आपोआप तब्बल दीड फुट उंच होतो आणि सायंकाळी पूर्ववत होतो, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. हा प्रकार अनुभवायचा असेल तर साकोली तालुक्यातील बोडे ते गिरोला मार्गावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुम्हाला जावे लागेल.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : एखादा रस्ता सकाळी आपोआप तब्बल दीड फुट उंच होतो आणि सायंकाळी पूर्ववत होतो, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. हा प्रकार अनुभवायचा असेल तर साकोली तालुक्यातील बोडे ते गिरोला मार्गावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुम्हाला जावे लागेल. गत काही दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार परिसरात औत्सुक्याचा विषय झाला असून रस्ता बांधकामातील गैरप्रकार की वैज्ञानिक चमत्कार अशी चर्चा परिसरात सुरु आहे. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची येथे वर्दळ दिसते.
साकोली तालुक्यातील बोंडे ते गिरोला (जपाणी) या सिमेंट रस्त्याचे बांधकाम गत वर्षी मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत करण्यात आला. या मार्गावर एक मोठे मंदिर आहे. पहाडीवरील मंदिरात जाण्यासाठी भावीक या रस्त्यावर ये-जा करतात. मंदिर साकोलीपासून अवघ्या १० ते १२ किलोमिटर अंतरावर आहे. या मंदिरावर जाण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला. सिमेंटच्या या रस्त्यावरुन वर्षभरापासून नागरिकांची ये-जा सुरु आहे. मात्र गत पंधरा दिवसांपासून अनोखा प्रकार येथे पहावयास मिळत आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता सकाळी आपोआप दीड फुट उंच होतो. सायंकाळपर्यंत हा रस्ता उंचवट्यासारखा दिसतो. मात्र सायंकाळी हा रस्ता पूर्ववत होतो. या रस्त्यावर कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उत आला आहे.
गत पंधरा दिवसांपासून तापमान ४५ अंशाच्या आसपास आहे. या तापमानामुळे रस्त्यात अशा बदल झाला असावा अशी चर्चा आहे. तर काहीजण या रस्त्याच्या कामातील गैरप्रकारामुळे हा चमत्कार होत असल्याचे सांगत आहे. परिसरात मात्र वेगवेगळ्या चर्चा करीत अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. या प्रकाराची तपासणी करावी आणि नेमके कारण शोधावे अशी मागणी बोडेचे माजी उपसरपंच विकास मेश्राम यांनी केली आहे.
सध्या साकोली तालुक्यात हा उंचावणारा रस्ता नागरिकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. वेगवेगळ्या चर्चांना येथे उत आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची पाहणी करून सत्य समोर आणावे अशी मागणी आहे.