अरुंद रस्त्यांवर हाड मोडणाऱ्या खड्ड्यांची भरमार; भंडारकर त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:00 PM2024-08-03T12:00:44+5:302024-08-03T12:02:40+5:30
रहदारीचे मुख्य मार्गच जीवघेणे : भंडारा पालिकेसह बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हे आहेत 'डेंजरस' रस्ते
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पितळी भांडे, कोळसा, धान, मॅग्नीज, रेती यासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचे शहर मुख्यालय आता खड्यांसाठीही प्रसिद्ध झाले की काय? असे निदर्शनास येत आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवर हाड मोडणारे जीवघेण्या खड्यांची भरमार झाली आहे. पावसाने रस्त्यांचे पितळ उघडे तर पाडलेच गुणवत्ताहीन कामाचीही पोलखोल केली आहे.
शहारात पार्किंगचा अभाव आहे. अतिक्रमणाची समस्या उग्र रूप धारण करून आहे. भंडारा शहरात बाहेरचा कुणी व्यक्ती आल्यास त्याचे स्वागत गचक्याने होते. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच खड्डे आहेत. तर शहराची काही स्थिती असेल याची जाणीव प्रत्यक्षरीत्या कदाचित त्या व्यक्तीला येत असावी, अंतर्गत रस्तेही खड्यांपासून सुटलेले नाहीत. महिनाभरात आलेल्या मुसळधार पावसाने डांबरी रस्त्यांची चांगलीच पोलखोल केली. काही मार्गावर तर एवढे जीव घेणे खड्डे आहेत की कुणाचा बळी जाईल याचा नेम नाही.
हे आहेत डेंजरस रस्ते
शहरातील मिस्कीन टैंक चौक ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौंक सर्वात डेंजर रस्ता ठरल आहे. यानंतर राजीव गांधी चौक ते नागपूर बायपास मार्ग सर्वात डेंजरस ठरला आहे. गल्लीबोडीतील खड्डे तर विचारूच नका. मात्र या रस्त्यांची डागडुजी असो की रस्ते निर्मिती याकडे पालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे. हा रस्ता आमच्या हद्दीत येत नाही, म्हणून चेंडू एकमेकांच्या दालनात टोलवला जात आहे.
टॅक्स द्यावे आणि खड्यातून जावे
भंडारेकर पालिका प्रशासनाला टॅक्स देतात. या कराच्या माध्यमातूनच शहराचा चांगला विकास व्हावा, अशी जनसामान्यांची इच्छा असते. मात्र भंडारा शहर पालिका हद्दीतील रस्त्यांची लागलेली वाट व बिकट अवस्था पाहून विचारच येतो. पालिका प्रशासनाला कर देऊनही हाड मोडणाऱ्या रस्त्यातून वाटचाल करीत असताना अनेक प्रश्न उद्भवतात. एखादवेळी जीवित हानी झाली, तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. उल्लेखनीय म्हणजे काही रस्त्यांवरील खड्डे चक्क अर्धा ते पाऊण फूट खोल आहेत. त्यात पावसाचे पाणी गेल्यावर ते किती खोल आहे, याची कल्पना येत नसल्याने सहजपणे अपघात घडत आहेत.