सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:36+5:302021-01-09T04:29:36+5:30
सासरा : परिसरातील विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करता यावी. शहरी विद्यार्थ्यांबरोबर खेड्यातील विद्यार्थ्यांना बरोबरी करता यावी. प्रत्येक विद्यार्थ्यांला ...
सासरा : परिसरातील विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करता यावी. शहरी विद्यार्थ्यांबरोबर खेड्यातील विद्यार्थ्यांना बरोबरी करता यावी. प्रत्येक विद्यार्थ्यांला शहरात जाऊन शिकणे अवघड आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करता यावी. तो कुठेही मागे पडू नये. पैशाअभावी तो विविध स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहू नये. या उदात्त हेतूने अतिशय गरिबी सहन करून केवळ जिद्द आणि चिकाटीने अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणारे आणि त्यातूनच सध्या तालुका संरक्षण अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असलेले चुन्नीलाल लोथे यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात पर्यायी व्यवस्था म्हणून सानगडी येथे दोन वर्षांपूर्वी सक्सेस अकॅडमी नावाची अभ्यासिका स्थापन केली. आजपर्यंत या अकॅडमीत अनेकांनी तयारी करून शासकीय नोकरीच्या संधी मिळविल्या. या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधून यश संपादन करून कर्तव्यावर असलेले भंडारा येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर, कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर, पी. एस. आय. भोजराम लांजेवार अशा अनेक यशस्वी महोदयांनी मार्गदर्शन करण्यासाठी भेट दिली आणि खेड्यातील या दिव्यव्रताचे भरभरून कौतुक केले.
विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तकांची फार मोठी गरज असते. या दिव्यव्रताच्या रथाला पुढे नेण्यासाठी पुस्तके, ग्रंथसंपदा यांची उणीव भरून काढणे फारच गरजेचे होते. या उदात्त, पवित्र कार्यात आपलासुद्धा खारीचा वाटा असावा असे अखिल भारतीय माळी महासंघ भंडाराचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी व भंडारा जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रविभूषण भुसारी यांना वाटले. त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची एकूण २२ पुस्तके तथा ग्रंथसंपदा सानगडी येथील सक्सेस अकॅडमीने उभारलेल्या अभ्यासिका वर्गाला भेट दिल्या.
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सहजशक्य व्हावे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत यश संपादन करता यावे. आर्थिक अडचणींवर मात करून अभ्यास करण्याचे पर्याय उपलब्ध व्हावे. या व असे अनेक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भुसारी बंधू यांनी ग्रंथदान करून भारतातील आद्यशिक्षिका, आद्यमुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांना अनोखी आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश संघटक सेवानिवृत्त परिवहन अधिकारी वेणूगोपाल शेंडे, माळी महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष, विहीरगावचे सरपंच रवींद्र खंडाळकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक पटले व सक्सेस अकॅडमीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.