अर्धवट बांधकाम दुरुस्तीने दोन्ही बंधारे फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:51+5:30
लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथे सन २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे दुरुस्ती काम मंजूर करण्यात आले होते. सदर काम परसोडी-आथली या ओढ्यावर दोन ठिकाणी गत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अंदाजपत्रकानुसार या दुरुस्ती बांधकामाअंतर्गत सिमेंट बंधाऱ्याचे काँक्रीटींग, जॅकेटींग व बंधाऱ्याच्या दुतर्फा पाळीच्या दगडाची पिचिंग करावयाचे होते अशी माहिती सबंधित बांधकामाचे अभियंता रंगारी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात मंजूर दोन कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट व निकृष्ट झाल्यानेच सबंधित बंधारे फुटल्याची माहिती खुद्द अभियंत्यांनी दिली. लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथील फुटलेल्या सिमेंट बंधाऱ्याची गत गरुवार रोजी पाहणी व चौकशी करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.
लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथे सन २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे दुरुस्ती काम मंजूर करण्यात आले होते. सदर काम परसोडी-आथली या ओढ्यावर दोन ठिकाणी गत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अंदाजपत्रकानुसार या दुरुस्ती बांधकामाअंतर्गत सिमेंट बंधाऱ्याचे काँक्रीटींग, जॅकेटींग व बंधाऱ्याच्या दुतर्फा पाळीच्या दगडाची पिचिंग करावयाचे होते अशी माहिती सबंधित बांधकामाचे अभियंता रंगारी यांनी दिली. मात्र कंत्राटदाराने सदर बांधकाम न केल्याने ओढ्याला पूर येवून अवघ्या दोन महिन्यातच दोन्ही बंधारे फुटले. या प्रकारात परसोडी येथील महादेव ठाकरे नामक शेतकऱ्याची धान शेती नष्ट होतांना अन्य सात शेतकऱ्यांच्या जवळपास २५ एकरातील धान शेतीचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी पीडित शेतकऱ्यानी नुकसान भरपाईची मागणी लावून धरली. याविषयी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन जागे झाले. याविषयी साकोली लघू पाटबंधारे उपविभागाचे अभियंता रंगारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी संबंधितांनी बंधाऱ्याची पाहणी व चौकशी करुन माहिती देऊ असे सांगितले होते. त्यानुसार अभियंता रंगारी यांच्याकडून माहिती घेतली असता गत दोन महिन्यापूर्वी या दोन्ही बंधाऱ्यांचे दुरुस्ती काम करण्यात आले. दोन्ही दुरुस्ती कामासाठी शासनाने केवळ १२ लक्ष १८ हजार ४६१ रुपयांचा निधी मंजूर केला. बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट व शिल्लक असून निधीदेखील शिल्लक असल्याचे सांगितले. मात्र आतापर्यंत झालेल्या बांधकामावर किती निधी खर्च झाला? किती निधी व कोणते काम शिल्लक आहे? तसेच उर्वरित काम केव्हा होणार? हे सांगणे टाळले.सिमेंट बंधारे दुरुस्ती बांधकामात गैरव्यवहार झाल्याची खमंग चर्चा असतांनाच अभियंत्यानी सदर बांधकाम अर्धवट व निकृष्ट असल्याचे बोलल्यान पाटबंधारे उपविभागाला ग्रहण लागल्याच्या चर्चेला सर्वत्र पेव फुटले आहे.