पोलिसासह दोघे 'एसीबी'च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:47 AM2019-06-08T00:47:50+5:302019-06-08T00:48:54+5:30
पकडलेल्या अवैध रेती ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस शिपायासह एका खाजगी व्यक्तीला दहा हजार रूपयाची लाच घेताना मोहाडी येथे रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पकडलेल्या अवैध रेती ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस शिपायासह एका खाजगी व्यक्तीला दहा हजार रूपयाची लाच घेताना मोहाडी येथे रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने केली.
आशिष भास्कर तिवाडे (३४) असे पोलीस शिपायाचे तर नेतराम शंकर साठवणे (३५) रा. मोहाडी असे खाजगी इसमाचे नाव आहे. या दोघांविरूद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहेगाव येथील एका ठेकेदाराचे रेतीचे ट्रॅक्टर सूरनदीपात्राजवळ पकडण्यात आले होते.
या प्रकरणी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी शिपाई आशिष तिवाडे याने दहा हजार रूपयाची मागणी केली. त्यावरून तक्रारदाराने थेट भंडारा येथील एसीबीचे कार्यालय गाठले. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी मोहाडी येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून दहा हजार रूपये स्विकारताना नेतराम शंकर साठवणे याला पकडण्यात आले. त्याने ही रक्कम पोलीस शिपाई आशिष तिवाडे याच्यासाठी घेतल्याचे सांगितले. दोघांविरूद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश मुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक महेश चाटे, प्रताप भोसरे, योगेश्वर पारधी, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, कोमल बनकर, कृणाल कढव, सुनील हुकरे, दिनेश धार्मिक यांनी केली. सदर प्रकरणी दोघांविरूद्ध मोहाडी पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले.