कागदपत्रे जाळपोळ प्रकरणात दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:54 PM2018-03-07T23:54:20+5:302018-03-07T23:54:20+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील लेखा विभागात असलेल्या टेबलवरील महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील लेखा विभागात असलेल्या टेबलवरील महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाचा तपास आधी भंडारा पोलीस आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर या पथकाने या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
दीपक अर्जुन मडावी व राकेश शाम चिंतलवार असे अटक करण्यात आलेल्या या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मडावी हे या कार्यालयात सहाय्यक लेखाधिकारी तर चिंतलवार हे वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर कार्यरत आहेत. ७ जुलै २०१७ ते १० जुलै २०१७ च्या दरम्यान डीआरडीए कार्यालयातील लेखा विभागात महत्त्वाची कागदपत्रे जाळण्यात आले होते. याची तक्रार वरिष्ठ सहाय्यक प्रवीण वझलवार यांनी भंडारा पोलिसात केली होती. या गंभीर प्रकरणात कार्यालयातील महत्त्वाच्या फाईल्स जाणीवपूर्वक जाळल्याचा संशय पोलिसांना आल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले होते. या प्रकरणात कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची साक्ष, नोंदी व चौकशी करण्यात आली. यात मडावी व चिंतलवार यांच्या उत्तरामुळे त्यांच्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता चिंतलवार यांनी महत्त्वाच्या फाईल्स जाळल्याच्या व अपहार केल्याची कबुली दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात कोणतेही साहित्य खरेदी न करता बनावट बिल सादर करून शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार करून चिंतलवार यांनी चैनीच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. अपहाराची ही रक्कम चिंतलवार यांनी लग्नामध्ये खर्च केल्याचेही कबुल केले आहे. बनावट देयके सादर करून रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याची बाब सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि ४०९, ४२०, ४७१, १२० (ब), २०१ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पोटे, पोलीस हवालदार वामन ठाकरे, पोलीस नायक रोशन गजभिये, पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल गजभिये, वैभव चामट हे करीत आहेत.
असे करायचे ‘ते’ अपहार
राकेश चिंतलवार हा ज्या घरी भाड्याने राहत होता. त्या घरमालकाच्या नावाने बँकेत खाते उघडून त्या खात्यावर आॅनलाईन बँकिंग सुविधा व घरमालकाकडून सही केलेले कोरे चेक घ्यायचे. त्या खात्यामध्ये शासकीय रकमेचे बनावटी बिल मंजूर केल्यानंतर रक्कम वळती करीत होता. ती रक्कम धनादेशाद्वारे काढून त्यातील काही रक्कम दीपक मडावी यांना देऊन त्यातील उर्वरीत रक्कम आॅनलाईन बँकिंगच्या माध्यमातून विविध कामात खर्च करीत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले.