भंडाऱ्यांचा चवदार ‘दुधी भोपळा’ पोहचला थेट दुबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:52 AM2018-01-06T10:52:16+5:302018-01-06T10:55:13+5:30

राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरालगतच्या बेला या गावातील संजय व स्मिता या गाढवे दाम्पत्याने धानपिकाला फाटा देत पिकविलेल्या ‘हारूणा’ या चवदार दुधी भोपळ्याची शेती करून देशातच नाही तर विदेशातही आपली ओळख निर्माण केली आहे.

Bottle gourd of Bhandara reached Dubai | भंडाऱ्यांचा चवदार ‘दुधी भोपळा’ पोहचला थेट दुबईत

भंडाऱ्यांचा चवदार ‘दुधी भोपळा’ पोहचला थेट दुबईत

Next
ठळक मुद्देएकरी ४० टन उत्पादनबेला येथील गाढवे दाम्पत्याची शेती

प्रशांत देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून असली तरी आता धान या पारंपरिक पिकासह येथील शेतकरी आधुनिक बागायती शेतीकडे वळल्याचे चित्र दिसू लागले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरालगतच्या बेला या गावातील संजय व स्मिता या गाढवे दाम्पत्याने धानपिकाला फाटा देत पिकविलेल्या ‘हारूणा’ या दुधी भोपळ्याची शेती करून देशातच नाही तर विदेशातही आपली ओळख निर्माण केली आहे.
बेला येथील ‘पाटील’ म्हणून ओळख असलेल्या संजय गाढवे व त्यांची पत्नी स्मिता यांनी शेतातील पारंपरिक धान पिकाऐवजी बागायती शेती करूनच नाही, तर त्यात प्रत्यक्ष राबून तीन एकरात दुधीची शेती पिकविली आहे.
हा दुधी भोपळा त्यांनी स्थानिक बाजारात न विकता थेट नागपूरचे निर्यातदार संजय घुमल यांच्याशी करार करून विक्रीला पाठविला. मागणीनुसार दिवसाआड एक टन (एक हजार किलो) भोपळा बेला येथून पाठविला जात आहे. तेथून तो थेट आखाती देशासह दुबईत विक्रीला जात आहे. या दुधी भोपळ्याला अल्पावधीतच मोठी मागणी वाढली आहे. गाढवे यांनी या शेतीतून दहा जणांना रोजगार दिला आहे.

अडीच लाखांचा नफा
लवकीला स्थानिक बाजारात कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे या शेतीकडे ग्रामीण शेतकरी वळत नाही. मात्र या दुधीला चांगला दर मिळाला आहे. दीड महिन्याच्या उत्पादनातून सर्व खर्च वजा जाता गाढवे यांना २.५० लाखांचा नफा झाला आहे. यामुळे त्यांनी बागायती शेतीतूनच आता ‘मिरची’ लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. यानंतर कारल्याचे उत्पादन घेऊन रोज हजार क्विंटल कारले विक्रीला पाठविण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचे त्यांनी आताच नियोजन सुरू केले आहे.

१२ एकरात बागायत (ड्रिप) शेती तयार केली आहे. दोन विहिरी असून या माध्यमातून बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला. धानशेतीतून नुकसान जास्त व उत्पादन कमी असल्याने दुधी, टमाटर, मिरची लागवड केली आहे.
- संजय गाढवे,
प्रगतीशिल शेतकरी, बेला.

Web Title: Bottle gourd of Bhandara reached Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती