चवताळलेल्या माकडाने चावा घेतल्याने मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:07+5:302021-08-28T04:39:07+5:30
कौशिक सुरेंद्र सार्वे (रा. खमारी, १४) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास कौशिक हा मित्रांसोबत ...
कौशिक सुरेंद्र सार्वे (रा. खमारी, १४) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास कौशिक हा मित्रांसोबत खेळत असताना घरावर उड्या मारणाऱ्या माकडांच्या टोळक्यातील एक माकड चवताळून त्याच्या अंगावर धावून आले. जीव वाचविण्याच्या भीतीने कौशिक पळत असतानाच कुंपणाला लावलेली बांबूची काठी मांडीत रुतल्याने तो जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याच्या आधी पंधरा मिनिटांपूर्वीच त्याच माकडाने सक्षम कैलास अहिरकर या पाच वर्षांच्या बालकाला ओरबडले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून गावात या माकडाचा हैदोस सुरू आहे. या टोळीतील एक माकड अतिशय उग्र स्वरूपाचे असून स्लॅबवर वाळू घातलेले कपडे काढायला गेलेल्या अनेक महिलांच्या कानशिलातही लावल्याचे काही जण सांगत आहेत. हे माकड विशेषत: लहान मुले, महिलांच्या अंगावर थेट हल्ला करत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभर घरावर संचार करणाऱ्या या माकडांमुळे मोठ्या प्रमाणात कौलारू, सिमेंट पत्रे असणाऱ्या घरांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या जीवितास धोकादायक ठरणाऱ्या या माकडांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर ठवकर, सुरेंद्र सार्वे, गणेश ठवकर, प्रदीप सनवारे, गजानन ठवरे, गिरधारी सनवारे, कमलेश ठवकर, संजय शेंडे यांनी केली आहे.