स्वीकृत सदस्यपदासाठी चढाओढ

By admin | Published: February 7, 2017 12:19 AM2017-02-07T00:19:11+5:302017-02-07T00:19:11+5:30

१९ डिसेंबरला नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांच्या झालेल्या निवडणुकीत भंडारा नगर परिषदेत भाजपला निर्विवाद विजय मिळाला.

A brawl for an approved member | स्वीकृत सदस्यपदासाठी चढाओढ

स्वीकृत सदस्यपदासाठी चढाओढ

Next

नगराध्यक्षाचे आज पदग्रहण : उपाध्यक्षपदाचीही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
भंडारा : १९ डिसेंबरला नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांच्या झालेल्या निवडणुकीत भंडारा नगर परिषदेत भाजपला निर्विवाद विजय मिळाला. पूर्वीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला नसल्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दीड महिना प्रतीक्षा करावी लागली होती. ८ जानेवारीला कार्यकाळ संपुष्ठात येत असल्यामुळे आज ७ जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे हे पदग्रहण करणार आहेत.
३३ सदस्यीय भंडारा नगर पालिकेत भाजपचे १५, राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे ३ आणि अपक्ष चार असे पक्षीय बलाबल आहे. नगर परिषद निवडणूक निकालानंतर अपक्ष रजनीश मिश्रा, दिनेश भुरे, कल्पना व्यास यांनी भाजपला समर्थन दिले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते शमीम शेख, अब्दुल मालाधरी आणि जयश्री बोरकर यांनीही शहराच्या विकासासाठी भाजपला समर्थन देत असल्याचे पत्र नगराध्यक्ष मेंढे यांना दिले.
निवडणूक निकालानंतर आशा पल्लवित झालेल्या भाजपच्या अनेकांनी स्वीकृतसदस्यांसाठी आपआपल्या नेत्यांकडून मोर्चेबांधणी केली. कुणी खासदार नाना पटोले यांच्या तर कुणी आमदार परिणय फुके यांच्या संपर्कात होते.
परंतु भाजपकडून दोन कोणती आणि राष्ट्रवादीकडून एक नाव कोणते याबाबत गोपणीयता पाळण्यात आली आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीने इच्छूकांना अर्ज दाखल करण्यासाठी सांगितले. एकूण ११ जणांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, सोमवारला सायंकाळपर्यंत माजी नगराध्यक्ष बाबूराव बागडे, माजी नगरसेवक भगवान बावनकर, योगेश हेडाऊ, विजय खेडीकर, स्वप्नील नशिने, भाजपचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, भाजप ओबीसी आघाडीचे मंगेश वंजारी, सचिन कुंभलकर, मनोज साकुरे, खान सत्तार खान अब्बास खान, शेख साहब शेख नूर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. योगेश हेडाऊ यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत.
उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले रूबी चढ्ढा यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्राने सांगितले. उपाध्यक्षपदासाठी अनेक नवखे नगरसेवक शर्यतीत होते. परंतु पक्षश्रेष्ठींनी चढ्ढा यांना उपाध्यक्ष करण्याचे निर्देश दिल्यामुळे चढ्ढा यांचा उपाध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंगळवारला सकाळी ११ वाजता होणाऱ्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या पदग्रहण समारंभाला भाजपचे प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, खासदार नाना पटोले, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी उपस्थित राहणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: A brawl for an approved member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.