सहा महिन्यातच कालवा सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:30 AM2024-11-28T11:30:37+5:302024-11-28T11:45:54+5:30
डाव्या कालवा पिंपरी चुन्नी शिवारातील प्रकार : टेलवरील शिवारात कालव्याचे कामे निकृष्ट
रंजित चिंचखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्याच्या शेत शिवारात जलद गतीने चांदपूर जलाशयाचे पाणी पोहचविण्यासाठी डावा कालवा सिमेंट अस्तरीकरण करण्यात आले. टेलवरील पिंपरी चुन्नी शिवारात सिमेंट अस्तरीकरण सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले. खरीप हंगामातील पहिल्याच सोडण्यात आलेल्या पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतात पाणी कसे पोहचणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांची चौकशीची मागणी होत आहे.
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्याचे शेतीला सिंचित करण्यासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. डावा आणि उजवा या मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर नहराच्या माध्यमातून शेतीला पाणी दिले जात आहे. कालव्यात झुडपे वाढत असल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. टेलवरील शेत शिवारात पाणी पोहोचत नाही. या परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाला करारबद्ध राहत असल्याने पाणी वाटपाची जबाबदारी याच विभागावर येत आहे.
सिमेंट अस्तरीकरण करण्यात येत असल्याने झुडपे वाढत नाही. पाण्याच्या प्रवाहाला गती येत आहे. सिमेंट अस्तरीकरणाच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला जात असताना यंत्रणा निधीचा दुरुपयोग करीत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य डावा कालव्यावरील पिंपरी चुन्नी शिवारात कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण गत सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे.
या कालव्यात खरीप हंगामातील पहिले पाणी चांदपूर जलाशयाचे सोडण्यात आले आहे. पहिल्याच पाण्याने सिमेंट अस्तरीकरणाच्या कामांना भेगा पडल्या आहेत. सिमेंट अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाला असल्याचे बोलके चित्र या कालव्यावर दिसून आले आहे. जलाशयाचे पाणी मिळत नाही. टेलवरील शेतात पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न फसला आहे. कालव्याची स्थिती 'जैसे थे' होणार आहे.
कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासली जात नाही? हा खरा प्रश्न आहे. अनेक कालवे आणि नहराला भगदाड पडले आहे. अलीकडे चांदपूर गावातच मुख्य उजवा कालवा फुटला होता. सिमेंट अस्तरीकरणाचान उपयोग नसल्याचा प्रसंग निदर्शनास आला होता.
आऊटलेटचे दरवाजे उघडे
खरीप आणि रब्बी हंगामात जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर आऊटलेटची भूमिका महत्त्वपूर्ण राहत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आऊटलेटचे महत्त्व वाढत आहे. शेतीला सिंचित करताना पाणी शेतात पूर्ण होताच आऊटलेट बंद करण्यात येत आहे. यामुळे अतिरिक्त पाणी नाल्यात जात नाही. परंतु आऊटलेटचे दरवाजे खुले असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.