अतिक्रमणाने कोंडला शहरातील बाजारपेठेचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 09:44 PM2019-03-28T21:44:29+5:302019-03-28T21:44:56+5:30
नागरिकांची नेहमी वर्दळ राहणाऱ्या भंडारा शहरातील मोठा बाजाराचा श्वास अतिक्रमणाने कोंडला गेला आहे. ऐन रस्त्यावर दुकाने थाटली गेल्याने रहदारीचा रस्ता चांगलाच अरुंद झाला आहे. त्यातच हेकेखोरपणा व मुजोरी वाढल्याने पालिका प्रशासनाचे कर्मचारीही कारवाई करण्यास धजावत आहे.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नागरिकांची नेहमी वर्दळ राहणाऱ्या भंडारा शहरातील मोठा बाजाराचा श्वास अतिक्रमणाने कोंडला गेला आहे. ऐन रस्त्यावर दुकाने थाटली गेल्याने रहदारीचा रस्ता चांगलाच अरुंद झाला आहे. त्यातच हेकेखोरपणा व मुजोरी वाढल्याने पालिका प्रशासनाचे कर्मचारीही कारवाई करण्यास धजावत आहे.
पावने दोन लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात बाजारपेठेची व्याप्तीही झपाट्याने वाढली आहे. वाढत्या नागरिकरणामुळे शहराच्या अन्य भागातही बाजारपेठ भरविली जाते. भंडारा शहरातील मोठा बाजार परिसर मात्र हा अंत्यंत रहदारीचा व नेहमी गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. शर्मा बालोद्यान ते बसस्थानकापर्यंतचा भाग मोठा बाजार परिसर म्हणून ओळखला जातो. या बाजारपेठेत चिल्लर वस्तू खरेदीपासून ठोक विक्रेत्यांचीही असंख्य दुकाने आहेत. याच भागात सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा, चार एटिएम केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाहतूक शाखा कार्यालय, दूरसंचार विभागाचे ग्राहक सेवा केंद्र, जिल्हा मुख्य पोस्ट कार्यालय, भाजीपाला बाजारपेठ, प्रसिध्द हनुमान मंदि, अन्नपूर्णा दुर्गा माता मंदिर, पाण्याचे लहान जलकुंभ, मिरची बाजारपेठ, सराफा लाईनसह शेकडो व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. परंतू या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने रहदारीला त्रास होत आहे.
विशेषत: बाजारपेठेतील बिसन हॉटेल ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दुरसंचार ग्राहक सेवा केंद्राजवळील चौक ते बसस्थानक मार्गावर तर अतिक्रमणाचा कळस बघायला मिळतो. पालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करुन न दिल्याने हातठेलाचालक, फेरीवाल्यांनी रस्त्यावरच सर्रास दुकाने थाटली आहेत.
परिणामी येथील रहदाीवर परिणाम होत असून या मार्गावरील मुख्य दुकाने अक्षरश: झाकल्या गेली आहे. रस्ता अरुंद झाल्याने लहान-मोठे अपघात घडत आहे. या मार्गावरील मुख्य दुकानासमोर बसस्थानक मार्गावर व लहान चौकात मोठ्या प्रमाणात लहान दुकानदारांनी दुकाने लावल्याने वादावादीचे प्रकारही वाढले आहेत. नियमित कराचा भरणा करुनही पालिका प्रशासन कुठलीच सुविधा देत नसेल तर कर द्यावा तरी कशाला असा सवाल, येथील व्यापारी विचारित आहेत. अतिक्रमण धारकांना अभय दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बाजाराच्या दिवशी हाल बेहाल
दर रविवारी मुख्य बाजार तर बुधवारी मिनी बाजार भरत असतो. मात्र अरुंद रस्त्यामुळे बाजाराच्या दिवश वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. पोस्ट आॅफीस चौक ते गांधी चौकापर्यंत एकेरी वाहतुक व्यवस्था असतांनाही वाहतुकीची कोंडी कमी झालेली नाही. विशेष म्हणजे, शहराच्या मुख्य मार्गावर पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही समस्या उग्र रुप धारण करीत आहेत. वाहतुक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.