लाचखोर लिपिक अडकला
By admin | Published: October 7, 2016 12:49 AM2016-10-07T00:49:43+5:302016-10-07T00:49:43+5:30
बेरोजगार अभियंत्याची नोंदणी करून देण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या लिपिकावर
सा.बां.विभागातील कारवाई : तीन हजार रूपयांची मागणी
भंडारा : बेरोजगार अभियंत्याची नोंदणी करून देण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (रोहयो) क्रमांक १ मध्ये गुरूवारी (दि.६) ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील तक्रारदार हे बेरोजगार अभियंता आहे. त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आॅनलाईन अर्ज केला होता. अर्जाची प्रत त्यांनी कार्यालयात जमा केली व त्यावर काय कार्यवाही झाली हे जाणून घेण्यासाठी ते जून महिन्यात संबंधित लिपिक प्रल्हाद श्रावण मते (३२, रा.बोथली, जि.भंडारा) यांच्याकडे गेले. त्यावेळी मते यांनी बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी १० हजार रूपयांची फिस भरावी लागणार असे सांगून चार हजारांची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने २६ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने २७ जुलै रोजी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पडताळणी केली असता मते यांनी बेरोजगार अभियंता नोंदणीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पंचांसमक्ष तीन हजार रूपयांची मागणी करीत रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी मतेविरूद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. (शहर प्रतिनिधी)