लाचखोर लिपीक कहालकरला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 12:35 AM2016-05-28T00:35:10+5:302016-05-28T00:35:10+5:30
सेवापुस्तकातील जुन्या नोंदी अद्यावत करण्यासाठी एक हजाराची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक ...
बांधकाम विभागातील प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा
भंडारा : सेवापुस्तकातील जुन्या नोंदी अद्यावत करण्यासाठी एक हजाराची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक अरूण कहालकरला २००५ मध्ये रंगेहात पकडले होते. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधिश एस. आर. शर्मा यांनी एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.
भंडारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याची बदली गोंदिया येथे झाली होती. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला शासकीय सेवेची नोंद घेण्यासाठी सेवापुस्तिकेची गरज होती. या सेवापुस्तिकेत जुन्या नोंदी अद्ययावत करून घेणे आवश्यक होते. तसी सेवापुस्तिकेत नोंद करून गोंदिया जिल्हा परिषदला पाठविण्याचे सांगितले. सदर सेवापुस्तिकेच्या नोंदीचे काम जिल्हा परिषद भंडारा येथे कार्यरत अरूण महादेव कहालकर या कनिष्ठ लिपिकाकडे होते. कहालकरने सदर कर्मचाऱ्यास सेवापुस्तिकेत नोंद घेण्यासाठी एक हजार रूपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने सदर कर्मचाऱ्याने याबाबत भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून कहालकरला १० नोंव्हेंबर २००५ ला पैसे घेताना रंगेहात पकडले होते.
याप्रकरणी त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवून तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुभाष पानसे यांनी प्रकरण न्यायदानासाठी विशेष न्यायालयात सादर केले. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग - १ एस. आर. शर्मा यांनी सर्व साक्षपुरावे तपासले. यात कहालकर दोषी आढळून आले. याप्रकरणी गुरूवारी न्यायाधीश ए. आर. शर्मा यांनी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
(शहर प्रतिनिधी)