उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:08+5:302021-08-14T04:41:08+5:30
भंडारा : केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत २०१६ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून दारिद्र्य रेषेखालील तसेच गरीब कुटुंबीयांना मोफत गॅसचे कनेक्शन देण्यात ...
भंडारा : केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत २०१६ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून दारिद्र्य रेषेखालील तसेच गरीब कुटुंबीयांना मोफत गॅसचे कनेक्शन देण्यात आले होते. देशात पाच कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसची झालेली दरवाढ व सर्वसामान्यांचा रोजगार फिरवल्याने महिलांचा स्वयंपाक हा चुलीवरच सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशात महागाईचा भडका वाढला असून या वाढत्या किमतीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आधीच आवश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून त्यात केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची भाववाढ करून गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली आमच्यावर, असा टाहो ग्रामीण भागातील महिलांनी फोडला आहे. तर उज्ज्वला योजनेचा फायदा तरी काय, अशीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तब्बल एक हजार रुपयांवर गॅस पोहोचल्याने अनेक महिला या जंगल, शेतशिवारात आकडे लाकडे मिळविण्यासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा जीव धोक्यात येत आहे
कोट
सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत आहे. गरिबांनी खर्च कसा भागवावा. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे महागाई वाढत आहे. सरकारने यासाठी काही तरी करायलाच हवे.
अनिता गिरेपुंजे, गृहिणी.
कोट
गरिबांनाच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ परवडणारी नाही. सरकारने वाढत्या महागाईवर काहीतरी नियंत्रण ठेवायला हवे. आणखी किती महागाई वाढणार आहे काय माहीत.
शशिकला मोथरकर,गृहिणी.
कोट
गॅस सिलिंडर वाटून काय फायदा?
खूप गाजावाजा करून उज्ज्वला योजना गरिबांसाठी असल्याचे सरकारने गरिबांना गॅस सिलिंडर स्वस्तात दिले; पण आज ग्रामीण भागात लाभार्थी गॅस सिलिंडर विकत घेऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. रोजच भरमसाट भाववाढ करून सामान्य माणसांचे जीवन जगणे आता कठीण होत आहे.
- अमित मेश्राम, तुमसर.
कोट
गॅस सिलिंडरची दरवाढ हे सर्वसामान्यांना परवडणारी नाही. मोफत गॅस कनेक्शन ऐवजी सिलिंडर घेण्यासाठी सवलत द्यावी, तरच गरिबांना दिलासा मिळेल.
विद्या धकाते, गृहिणी.