पोलीस बनण्यासाठी हवी तल्लख बुद्धिमत्ता : सॉफ्टवेअरसाठी लावा लॉजिक
By admin | Published: May 27, 2015 12:36 AM2015-05-27T00:36:26+5:302015-05-27T00:36:26+5:30
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपत आल्या असून बरेचसे युवक स्पर्धा परीक्षांची ...
भंडारा : उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपत आल्या असून बरेचसे युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊन तयारी करायला हवी. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांना करिअरसाठी तर मुलांना मार्गदर्शन करु पाहणाऱ्या पालकांसाठीही प्रभावशाली ठरू शकतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन हा शाळा, कॉलेजात असल्यापासूनच निर्माण व्हायला हवा.
मेहनत आणि पूर्वतयारी आवश्यक
आपण निवडत असलेल्या पदांची विशिष्ट गुणकौशल्ये असतात व ती आपल्यात असणे अनिवार्य आहे. पोलीस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डिटेक्टिव्ह मार्इंड, तंदुरुस्त व चपळ शरीर असावे लागते. सॉफ्टवेअर क्षेत्रासाठी ‘लॉजिक’ करिअर एक कार्यक्षेत्र आहे व जशी कार्यक्षेत्रे बदलतात तशी जीवनपद्धती व वर्तणूक बदलावी लागते. नवी गुणकौशल्ये आत्मसात करावी लागतात व आपल्यातील काही दोष प्रयत्नपूर्वक घालवावे लागतात. यासाठी एक सुंदर इंग्रजी म्हण आहे - ‘मोर यु स्वेट इन द प्रॅक्टिस, लेस यू विल ब्लीड इन द बॅटलफील्ड’ म्हणजेच जितकी आधी मेहनत आणि पूर्वतयारी कराल तितका कमी त्रास तुम्हाला भविष्यात होईल.
८ वी ते १२ वीपर्यंतची
पुस्तके वाचा
एनसीआरटी, सीबीएससी, पॅटर्नची ८ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तके वाचणे फायद्याचे ठरते. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची असून त्याची टिपणे काढण्याची प्रथम स्वत:ला सवय लावली पाहिजे. या पुस्तकांमधील माहिती ही स्पर्धा परीक्षेचा खरा पाया आहे. यामुळे ही लहान मुलांची पुस्तके असल्याचा विचार करू नका, तर ती पुस्तके दृष्टिक्षेपात ठेवणे गरजेचे आहे.
सामान्य ज्ञान वाढविण्यावर भर द्या
आपण किती बुद्धिमान आहोत याची चाचणी परीक्षेत मिळविलेल्या गुणांवर नव्हे, तर ती आपल्या सामान्यज्ञानातून समोर येते. यामुळे सामान्य ज्ञान वाढविण्यावर शैक्षणिक वर्षापासूनच भर देणे अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक बुद्धिमत्ता चाचणी आहे. यात प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने वेगाने आकडेमोड करणे आवश्यक असते.
त्यासाठी पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांना वेध घेता येतो. विचार प्रगल्भ होतात.
वाचनाची आवड असावी. कारण अभ्यासक्रम व्यापक असून सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) सारख्या विषयात तर ‘सिलॅबस’ कुठून सुरू होतो व कुठे संपतो याचा अंदाज लावणेही कठीण आहे. (प्रतिनिधी)
गणिताची भीती नकोच
गणिताच्या नावाने अनेकांच्या अंगावर शहारे येतात. हा कठीण वाटणारा विषय पण स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देणारा आहे. पण त्याचा पाया शालेय जीवनातूनच मजबूत असला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो. यामध्ये काळ, काम, वेग, नातेसंबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद, इ. बाबींवर प्रश्न विचारले जातात. पाढे पाठ असणे, वर्ग घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चित फायदा होतो. एक गणित सामान्यत: ४० सेकंदाच्या आत सोडवायचे असतात.
इंग्रजी तर मस्टच आहे
आपल्याला येणारी भाषा ही सर्वात चांगली आहे. या भ्रमात न राहता ग्लोबल भाषा म्हणून ख्याती असलेल्या इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळविणे महत्त्वाचे आहे. इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे.याची सुरुवात कशी करावी? व्याकरणाकडे लक्ष द्या, इंग्रजी वर्तमानपत्रे वाचा, नंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवा.
हस्ताक्षर अािण शुद्धलेखनाची भूमिका
आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल तर आपले नुसते ज्ञान चौफेर असून भागणार नाही, तर त्याचे सादरीकरणही चांगले हवे. त्यासाठी सुंदर हस्ताक्षर ही पहिली तर मुद्देसूद लेखनशैली ही दुसरी पायरी आहे. शुद्धलेखनासाठी व्याकरणाची पुस्तके सतत हाताशी ठेवा, म्हणजे पुढचे प्रश्न आपसूकच मिटतील.