भाऊ वहिणीलेबी वोट देवाले गावाला आणा हं...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:40+5:302021-01-09T04:29:40+5:30
मोहाडी : भाऊ मी ग्रामपंचायत निवडणुकीत उभा आहे. मले मतदान करायले गावाले या. मी तुमची येण्याजाण्याची सुविधा करीन ...
मोहाडी : भाऊ मी ग्रामपंचायत निवडणुकीत उभा आहे. मले मतदान करायले गावाले या. मी तुमची येण्याजाण्याची सुविधा करीन नक्की या हं..अन वहिणीले बी सांगा वोट देवाले मनून. अशी गळ उमेदवार गावापासून स्थलांतरित झालेल्या मतदारांना घालीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान चिन्ह उमेदवारांना मिळाले. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहेत. उमेदवारांच्या नजरा मतदारांकडे वळल्या आहेत. विशेषतः बाहेरगावी राहणारे तसेच कामासाठी स्थलांतरित झालेले कुटुंबाकडे जास्त लक्ष लागले आहे. गावातील बरीच व्यक्ती शहरांकडे रोजगार व नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेली आहेत. ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होत असते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला महत्त्व प्राप्त होत असते. गावपुढाऱ्यांना ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी गावातील मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तसेच गावातून बाहेर गेलेला मतदार गावी येण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.
उमेदवार बाहेर असणाऱ्या मतदारांना जाण्यायेण्याची सुविधा व गाव भेट करण्याची संधी देण्याची हमी दिली जात आहे. आपसूकच मतदारांना या निमित्त गाव भेटी होणार असल्याने त्यांना हायसे वाटत आहे. तसेच मतदारांच्या एका दिवशीच्या रोजीचा (मजुरी) चा प्रश्न सोडविला जाण्याचे आश्वासन दिले जात आहे.
शिवाय बाकीचा सन्मानही केला जाणार असल्याचे आमिष दाखविले जात आहेत. त्यामुळे त्यांची मत हमखास मिळण्याची शक्यता अधिक असते. या कारणामुळे उमेदवारांनी गावातील किती मतदार बाहेर आहेत याची यादी केली आहे. मतदार आलेच पाहिजेत यासाठी युद्धस्तरावर उमेदवारांची तयारी सुरु आहे. उमेदवार त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करीत आहेत. त्यांना सांगत आहेत, भाऊ तुमचा एक- एक मत मोलाचा आहे. तुमच्या मताचा मला आशीर्वाद हवा. तुमच्या मतांमुळे मी निवडून येऊ शकतो. असे सांगून, भाऊ, दादा तुम्ही वहिनी व सगळ्यांना गावी १५ तारखेला घेऊन या . मी तुमची सगळी सुविधा करेन, असे सांगून येण्याची विनंती करीत सुटले आहेत.