ब्रिटीशकालीन रेल्वे कॅबिन आता होणार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:01:02+5:30
ब्रिटीशांनी संपूर्ण देशभर रेल्वेचे जाळे विणले. आजही ब्रिटीशकाळातील वास्तू ठिकठिकाणी उभ्या आहेत. ब्रिटीशांनी रेल्वे आणली तेव्हा रेल्वे यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी कॅबिनची व्यवस्था केली होती. या कॅबिनमधूनच रेल्वेचा आवागमनावर नियंत्रण ठेवले जात होते. कोणती रेल्वे कोणत्या रूळावरून धावेल हे कॅबिन मॅन त्यांना मिळालेल्या सूचनेवरून निर्धारित करीत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वेला योग्य रूळावर नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाºया ब्रिटीशकालीन रेल्वे कॅबिन आता इतिहास जमा होणार आहे. ऑटो सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वीत झाल्यानंतर या रेल्वे कॅबिन भुईसपाट करण्यात येणार आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील या कॅबिन हद्दपार होणार आहे.
ब्रिटीशांनी संपूर्ण देशभर रेल्वेचे जाळे विणले. आजही ब्रिटीशकाळातील वास्तू ठिकठिकाणी उभ्या आहेत. ब्रिटीशांनी रेल्वे आणली तेव्हा रेल्वे यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी कॅबिनची व्यवस्था केली होती. या कॅबिनमधूनच रेल्वेचा आवागमनावर नियंत्रण ठेवले जात होते. कोणती रेल्वे कोणत्या रूळावरून धावेल हे कॅबिन मॅन त्यांना मिळालेल्या सूचनेवरून निर्धारित करीत होता. प्रत्येक रेल्वे स्थानकावर अशा कॅबिन उभारल्या होत्या. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरही प्रत्येक रेल्वे स्थानकानजीक या कॅबिन आहेत. देव्हाडी येथे पूर्व व पश्चिमेला दोन कॅबिन आहे. सध्या रेल्वेचे स्विचमन येथे कार्यरत आहे. देव्हाडी येथील कॅबिनला जवळपास ८५ वर्ष पूर्ण झाले आहेत. मोठ्या स्थानकावर स्वयंचलीत यंत्रणेचा वापर केला जात आहे.
आता देव्हाडी येथेही रेल्वे ऑटो सिग्नलींग यंत्रणा उभी करीत आहे. देव्हाडी रेल्वे क्रॉसिंग क्रमांक २३२ वर मुंबई-हावडा रेल्वे मार्ग तथा तिरोडीकडे जाणाºया रेल्वे मार्गावर ऑटो सिग्नलिंग यंत्रणा उभी केली जात आहे. प्रवासी व मालवाहतूक गाड्यांची मोठी संख्या तिसºया रेल्वे ट्रॅकमुळे दळणवळणात होणारी वाढ, मानवी वापराने अपघाताची शक्यता गृहीत धरून आता स्वयंचलीत प्रणाली उभारली जाणार आहे. परिणामी ब्रिटीशांनी उभारलेली या कॅबिन आता भुईसपाट केल्या जाणार आहे. त्यानंतर एका लहानशा खोलीतून स्वयंचलीत यंत्रणेद्वारे रेल्वे नियंत्रित केली जाणार आहे. रेल्वे कॅबिनची इमारत ८५ वर्षानंतरही मजबूत स्थितीत आहे.
विदेशात जतन
रेल्वेच्या यंत्रणेत कॅबिनला अनन्य साधारण महत्व होते. परंतु अलिकडे स्वयंचलीत यंत्रणा कार्यान्वीत होत असल्याने या कॅबिन इतिहास जमा होत आहे. मोठ्या रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे जक्शनवर स्वयंचलीत यंत्रणेचा वापर केला जात आहे. रेल्वे स्थानकाबाहेर मोठी कॅबिन काही रेल्वे स्थानका शेजारीच दिसते. मात्र आता त्याही भुईसपाट केल्या जाणार आहे. इंग्लडमध्ये अशा रेल्वे कॅबिन जतन करण्यात आले आहे. ब्रिटीशांनी एकच डिझाईन तयार केली होती. कॅबिन आतमध्ये पूर्ण पोकळ तयार करण्यात येते. तेथील सांध्यांचा संबंध थेट रेल्वे ट्रॅकशी येतो. एका रेल्वे ट्रॅकमधून दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे जाण्यासाठी सांधे मदत करतात. आता स्वयंचलीत यंत्रणेमुळे सांधे बदलविणे यंत्राद्वारे केले जात आहे. इंग्लड प्रमाणेच भारतातील रेल्वे कॅबिनचे जतन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.