खाणीत ब्लास्टिंग अन् घरांना तडे.. नागरिक म्हणतात, जाऊ कुणीकडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:45 PM2023-08-28T12:45:59+5:302023-08-28T12:47:55+5:30
दर दोन दिवसात ओपन कास्ट ब्लास्टिंग
मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्यात चिखला येथे ब्रिटिशकालीन भूमिगत खाण आहे. येथे दर दोन दिवसात खाण परिसरातील नैसर्गिक टेकड्यात मोठे छिद्र करून ओपन कास्ट ब्लास्टिंग केली जात आहे. खाण ही भूमिगत असल्याने बाहेरील परिसरात ओपन ब्लास्टिंग करण्याचे कोणतेच कारण नाही. या ब्लास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित असून यामुळे चिखला परिसरातील नागरिकांच्या घरांना तडे जात आहेत. तडे गेलेल्या घरात वास्तव्यामुळे नागरिकांच्या जीव धोक्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी आपण कुणीकडे जावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे.
तुमसर तालुक्यात चिखला येथे भूमिगत मॅगनिज खाण असून या परिसरात नैसर्गिक टेकड्या आहेत. संपूर्ण परिसर सातपुडा पर्वतरांगात आहे. दर दोन दिवसांनी येथे खाण प्रशासनाकडून ओपन कास्ट ब्लास्टिंग केली जात आहे. त्यामुळे चिखला गावातील नागरिकांच्या घरांना तडे आले असून अनेक ठिकाणी भिंती दुभंगल्या आहेत.
ग्रामपंचायतीकडे तक्रार
चिखला येथे खाण प्रशासनाकडून ब्लास्टिंग होत असल्याने गावातील घरांना तडे गेले. यासंदर्भात स्थानिक नागरिकांना चिखला ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे. ब्लास्टिंगची तीव्रता कमी करावी तसेच खाण बाहेरील क्षेत्रात ब्लास्टिंग करणे बंद करावे, अशी तक्रार करण्यात आली. ही तक्रार २० जुलै रोजी देण्यात आली. परंतु अजूनपर्यंत खाण प्रशासनाने तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे.
जीव मुठीत घेऊन वास्तव्य
चिखला येथील घरांना तडे जाणे, भिंतीत भेगा पडणे असा प्रकार सुरू असल्यानंतरही खाण प्रशासनाने यावर कोणतीही उपायोजना केली नाही. तडे गेलेल्या घरात वास्तव्य करणे हे अतिशय धोकादायक आहे. घरांना झालेले नुकसान खाण प्रशासनाने भरून देण्याची येथे गरज आहे. त्याकडे खाण प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.
भूमिगत खाण तरी बाहेर ब्लास्टिंग
चिखला येथे भूमिगत मॅगनिज खाण आहे. भूमिगत खाणीत आतमध्ये ब्लास्टिंग निश्चितच करण्यात येत असेल, परंतु चिखला खाण परिसरात नैसर्गिक टेकड्यांत मोठे छिद्र करून तिथे ब्लास्टिंग करणे सुरू असल्याने खाण प्रशासनाच्या कार्यक्रमावर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खाण मंत्रालयाने नैसर्गिक टेकड्यातून मॅगनिज उत्खनन करण्याची परवानगी दिली काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वत रांगात आहेत. वनविभागाने येथे प्रत्यक्ष मोका चौकशी करण्याची गरज आहे.
पदाधिकारी व नागरिकांचा एल्गार
खाण प्रशासनाने सातत्याने ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. चिखल या गावाला धोका निर्माण झाला आहे. त्याकरिता येथील सरपंच करुणा कोकोडे, उपसरपंच दिलीप सोनवाणे, ग्रामपंचायत सदस्य वृषभ मेश्राम, नंदकिशोर गजभिये, पुरुषोत्तम भुतांगे, महेंद्र कठोते, उषा टेंभुरकर, जिरन डोबनऊके, मनीषा मरस्कोले, रजनी शिवणे, मंगला खोब्रागडे, रंजीता कठोते तथा ग्रामस्थांनी येथे एल्गार पुकारला आहे.