ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर पडले अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:17 PM2018-10-06T14:17:55+5:302018-10-06T14:26:18+5:30
गावात येणाऱ्या प्रत्येक आगंतुकाच्या इत्थंभूत माहितीची नोंद असणारे महत्वाचे दस्तावेज म्हणजे ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गावात येणाऱ्या प्रत्येक आगंतुकाच्या इत्थंभूत माहितीची नोंद असणारे महत्वाचे दस्तावेज म्हणजे ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर. पोलीस पाटलांकडे असलेल्या या रजिस्टरमधील नोंदीवरून गुन्हेगारांचा माग काढण्यात मोठी मदत व्हायची. आपल्या हद्दीत गुन्हा घडला की पोलीस प्रथम याच रजिस्टरचा आधार घ्यायचे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मुशाफिरी रजिस्टर अडगळीत पडले असून प्रशासनालाही याचा विसर पडल्याचे दिसत आहे.
प्राचीन काळापासून गावाचा कारभार सांभाळण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यातूनच मुसाफिरी रजिस्टरचा जन्म झाला असावा. माहिती ठेवण्याची पद्धत इंग्रजांनी देशात सुरू केल्याचे सांगितले जाते. मात्र नेमकी ही पद्धत केव्हा सुरू झाली हे आज कुणालाही सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी गावकुसाबाहेर पाल ठोकून राहणाºयांची संख्या मोठी असायची. अनेक कुटुंब उपजीविकेसाठी सतत भटकंती करायचे. या मंडळींची नोंद विशिष्ट बांधणीच्या मुसाफिरी रजिस्टरमध्ये घेतली जायची. त्यात गावात आलेल्या अनोळखी व्यक्तीचे पूर्ण नाव, गाव, जात, व्यवसाय, कोणत्या गावावरून आले, कोणत्या गावाला जाणार, गावात किती दिवस मुक्काम आहे. सोबत कोण-कोण आहे यासह अंगावरील ओळखचिन्हांची नोंद घेतली जाते. गावात अनोळखी आला की सर्वप्रथम कोतवाल पोलीस पाटलांना सूचना देतो. त्यांची नोंद घेतली जाते.
एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्यास सर्वप्रथम या रजिस्टरचा आधार घेतला जायचा. त्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा शोध घेऊन गुन्ह्यांचा छडा लावला जायचा. राज्यात अनेक गुन्ह्यांचा शोध लागण्यात मुसाफिरी रजिस्टरने महत्वाची भूमिका बजावली. प्रत्येक गावातील पोलीस पाटील आजही यात न चुकता नोंदी घेत आहेत. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या रजिस्टरचे महत्व कमी होत आहे. पोलीस विभाग आता या रजिस्टरकडे पाहायलाही तयार नाही. विविध कामांसाठी महत्वाचे दस्तवेज ठरू पाहणारे हे रजिस्टर आता अडगळीत पडले आहे.
रजिस्टरमधील नोंदीवरून मिळाले जात प्रमाणपत्र
जात प्रमाणप्रत्र काढण्यासाठी पूर्वजांच्या जातीचा उल्लेख असलेले अभिलेखे ग्राह्य धरले जातात. जन्ममृत्यूची नोंद असणारे कोटवार बुक महत्वाचा पुरावा मानला जातो. मात्र सतत भटकंती करणाऱ्यांच्या अशा नोंदी सापडणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. असा अनुभव वडार आणि मांगगारुडी समाजातील काही व्यक्तींना आला. मात्र भंडारा जिल्ह्यातील एका गावात मुसाफिरी रजिस्टरमध्ये असलेल्या जातीच्या नोंदीवरून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झाली. एवढे महत्वाचे दस्तावेज आता दुर्लक्षित होत आहे.
गावात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीची नोंद आजही मुसाफिरी रजिस्टरमध्ये घेतली जाते. आमच्या पिंडकेपार गावच्या रजिस्टरमध्ये १९६७ पासूनच्या अद्ययावत नोंदी आहेत. पूर्वीचे रजिस्टर जीर्ण झाले आहेत. त्यामुळे शासनाने या रजिस्टरचे डिजिटलायझेशन करावे. त्याचा उपयोग सामाजिक इतिहास संशोधकांना होऊ शकतो.
-सुधाकर साठवणे, जिल्हाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना, भंडारा.