डोंगरगावच्या ज्योती गडेरियाला पॅरारोव्हिंगमध्ये कांस्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:00 AM2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:30+5:30
दक्षिण कोरियात एशियन पॅरारोव्हिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहाडी तालुक्यातील ज्योती गडेरिया आपल्या संघासह सहभागी झाली. या स्पर्धेत तिने पाच देशाला मागे टाकत कांस्यपदक मिळविले. एका ग्रामीण भागातील तरुणीने जिद्दीने हे यश संपादित केले. मंगळवारी सायंकाळी तिचे भंडारा येथे आगमन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अपघातात पाय गमावल्यानंतरही जिद्दीने संघर्ष करणाऱ्या ग्रामीण भागातील एका तरुणीने पॅरारोव्हिंगमध्ये कांस्यपदक पटकावून भंडारा जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची मान उंचावली. दक्षिण कोरियात झालेल्या रोव्हिंग स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकाविले. ही तरुणी आहे मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील ज्योती गडरिया.
दक्षिण कोरियात एशियन पॅरारोव्हिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहाडी तालुक्यातील ज्योती गडेरिया आपल्या संघासह सहभागी झाली. या स्पर्धेत तिने पाच देशाला मागे टाकत कांस्यपदक मिळविले. एका ग्रामीण भागातील तरुणीने जिद्दीने हे यश संपादित केले. मंगळवारी सायंकाळी तिचे भंडारा येथे आगमन झाले. त्यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. कोरिया येथून कांस्यपदक जिंकून ज्योतीचे मंगळवारी रात्री ९.३० वाजता भंडारा बसस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी रोव्हिंग असोसिएशन, लॉयन्स क्लब ग्रीन सिटी, भ्रूशुंड ढोल पथकाच्या वतीने तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष जॉकी रावलानी, उपाध्यक्ष मंगेश वंजारी, कोषाध्यक्ष राजेश चोपकर, भरत मल्होत्रा, आशिष खराबे, सुरेश धुर्वे, गजानन कारेमोरे यांच्यासह तिच्या डोंगरगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडारा येथे स्वागतानंतर ती आपल्या मूळ गावी डोंगरगाव येथे पोहचली. तेथेही तिचे गावकऱ्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. गावकºयांना आपल्या लेकीचे कौतुक आहे.
ग्रामीण तरुणीचे नेत्रदीपक यश
मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील ज्योती गडेरिया ही सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी. वडिलांचा बिछायत केंद्राचा व्यवसाय. काही वर्षापूर्वी रस्त्यावर उभी असताना ट्रकने तिला धडक दिली. त्यात तिचा एक पाय कापावा लागला. विपरित परिस्थितीतही तिची जिद्द मात्र कायम होती. अशातच तिने पुणे येथील आर्मी रोव्हिंग नोड येथून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षक विकल अरुण सार्वे यांच्या मार्गदर्शनात तिने रोव्हिंगचे धडे घेतले. तिला कर्नल दत्ता यांचे मार्गदर्शन लाभले. चिकाटी आणि जिद्दीच्या भरोशावर दिव्यंगात्वावर मात करीत ज्योतीने सातासमुद्रापार आपल्या देशाचा झेंडा रोवला. तिचे संपूर्ण विदर्भात कौतुक केले जात आहे.