बहिणीने पोलिसात तक्रार दिल्याच्या तणावात भावाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 05:09 PM2022-09-22T17:09:22+5:302022-09-22T17:11:33+5:30
मांढळची घटना : दोन महिन्यांपूर्वी बहिणीवर केला होता चाकूहल्ला
लाखांदूर (भंडारा) : घरगुती वादात भावाने बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. बहिणीने पोलिसांत तक्रार दिली. तेव्हापासून तणावात असलेल्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मांढळ येथे बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
गोविंदा अर्जुन कांबळे (६०) रा. मांढळ असे मृताचे नाव आहे. त्याचे बहीण मैनाबाई चंडी मेश्राम (४५) रा. जुनोना ता. पवनी सोबत दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. या वादात गोविंदाने बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी लाखांदूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गोविंदा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी देखील गोविंदाने विष प्राशन केले होते. मात्र त्याच्यावर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने तो बचावला होता. मात्र तो नेहमीच तणावात राहत असल्याची महिती आहे.
बुधवार २१ सप्टेंबर रोजी गोविंदाची न्यायालयात तारीख होती. मंगळवारी रात्री घरातील सर्व मंडळी झोपी गेले. बुधवारी पहाटे घरामागील भागात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली.
लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक ऋषी गभने, हवालदार गोपाल कोसरे, पोलीस अंमलदार योगराज घरट यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद लाखांदूर ठाण्यात घेण्यात आली असून तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.