धावत्या बसमध्ये सरपटणाऱ्या प्राण्याचा महिलेला दंश
By admin | Published: July 7, 2017 12:53 AM2017-07-07T00:53:34+5:302017-07-07T00:53:34+5:30
तुमसर आगाराच्या धावत्या बसमध्ये एका महिलेच्या पायाला सरपटणाऱ्या प्राण्याने चावा घेतला. रक्तस्त्राव
महिलेवर तुमसरात उपचार सुरू : तुमसर-अकोला बसमधील प्रवाशांमध्ये खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर आगाराच्या धावत्या बसमध्ये एका महिलेच्या पायाला सरपटणाऱ्या प्राण्याने चावा घेतला. रक्तस्त्राव झाल्याने या महिलेने एकच आरडाओरड केली. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे बसमधील अन्य प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर चालकाने तातडीने बस थांबविली. सध्या त्या महिलेवर तुमसर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना तुमसर-अकोला प्रवासी बसमध्ये गुरूवारी सकाळी १० वाजता घडली.
तुमसर ते अकोला दरम्यान धावणारी जलद बस सकाळी १० वाजता तुमसर येथून ५० ते ५५ प्रवाशांना घेऊन निघाली होती. तुमसर बाजार समितीपुढे धावत्या बसमध्ये कुंदा वैद्य रा.तुमसर यांच्या पायाला काहीतरी रूतल्याचा भास झाला. त्यानंतर त्यांनी पायाकडे बघितले असता रक्तस्त्राव सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पायाला वेदना होऊ लागल्यामुळे त्यांनी खाली वाकून बघितले असता त्यांना सीटच्या खाली काहीतरी सरपटणारा प्राणी दिसला. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चालकाने तिथेच बस थांबविली. बसमधील सर्व प्रवाशी एका पाठोपाठ खाली उतरले.
बसवाहक व चालकाने घडलेला प्रकार आगारप्रमुखांना भ्रमणध्वनीवर सांगितला. आगारातून अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण बसची तपासणी केली असता तिथे काहीच आढळले नाही. चालक व वाहकांची खात्री झाल्यावर बस पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आली. त्यानंतर, कुंदा वैद्य यांना तुमसर उपजिल्हा रूग्णालयात तातडीने हलविण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तुमसर उपजिल्हा रूग्णालयात कुंदा वैद्य यांच्यावर उपचार सुरू असून तो दंश कशाचा आहे, याची तपासणी सुरू आहे. त्यांना निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
-डॉ. सचिन बाळबुद्धे, अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, तुमसर.
तुमसर-अकोला बसच्या चालक वाहकाला बसची तपासणी केल्यानंतरच बस पुढील प्रवासाकरिता नेण्याच्या सूचना देण्यात आली. अन्यथा बस परत डेपोत आणावे, अशी सूचना दिली होती.
- नितीन उजवणे, आगारप्रमुख तुमसर.