भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या बालसमुद्र तलावात सापडले बौद्धकालीन शिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 12:23 PM2021-07-10T12:23:52+5:302021-07-10T12:24:18+5:30
Bhandara News प्राचीन नगरी पवनी येथील किल्ल्याजवळील बालसमुद्र या तलावात बौद्धकालीन शिल्प सापडले असून हे शिल्प एका मोठ्या शिल्पाचा तोडलेला भाग असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्राचीन नगरी पवनी येथील किल्ल्याजवळील बालसमुद्र या तलावात बौद्धकालीन शिल्प सापडले असून हे शिल्प एका मोठ्या शिल्पाचा तोडलेला भाग असल्याचे दिसून येते. पवनी येथील माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी व आनंद विलास रामटेके यांच्या निदर्शनास हे शिल्प आले. त्यांनी शिल्प तलावाच्या बाहेर काढून जगन्नाथ स्तूपाच्या परिसरात ठेवले आहे.
ऐतिहासिक व प्राचीन नगर म्हणून पवनीची ओळख आहे. या नगरीला बौद्ध धम्माचा इतिहास आहे. या परिसरात जगन्नाथ, चांडकापूर व हरदोलाल नावाने ओळखले जाणारे तीन बौद्ध स्तूप उत्खननात सापडले आहेत. त्यापैकी जगन्नाथ स्तूप तहसील कार्यालयाजवळ असून चांडकापूर स्तूप पुरातन ब्रह्मपुरी-चांदा मार्गावर आहे. हरदोलाल नावाने प्रसिद्ध स्तूप पवनी-खापरी मार्गाच्या बाजूला आहे.
जगन्नाथ स्तूप असलेल्या जागेचे भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्खनन केले आहे. या उत्खननात अनेक बौद्ध शिल्प व शिलालेख सापडले आहेत. त्यापैकी मुचलिंद नागराजाचे व नागस पंचनिकायस असे ब्राह्मी लिपीतील शिलालेख व शिल्प प्रसिद्ध आहेत. तसेच विविध दात्यांनी दिलेल्या दानाचे शिलालेख देखील आहेत. जगन्नाथ मंदिराच्या परिसरात विखुरलेल्या अवशेषांची तोडफोड करून विध्वंसक प्रवृत्तीच्या व्यक्तीने जवळच्या बालसमुद्र तलावात फेकून दिले आहेत. त्यापैकी अशाच एका मोठ्या शिल्पाचा तोडलेला भाग या तलावाच्या काठावर सापडला आहे. चौकीदार जनार्दन खरकाटे यांच्या मदतीने शिल्प बाहेर काढून सुरक्षित ठेवले आहे. तलावात असे अनेक शिल्प असावेत, असा अंदाज आहे.
शिल्पावर धम्मचक्र
बालसमुद्र तलावात आढळलेल्या शिल्पावर धम्मचक्र कोरलेले आहे. त्यामुळे त्याचे मोठे महत्त्व आहे. या शिल्पाचा पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा व हे शिल्प कोणत्या संदर्भात आहे, याचे संशोधन करावे तसेच शिलालेखांचे संरक्षण करावे, अशी मागणी माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी यांनी केली आहे.