जेवनाळा ते निमगाव रस्ता नाल्यावर पुल तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:48+5:302021-01-08T05:53:48+5:30
०४ लोक १३ के भंडारा : लाखनी तालुक्यातील जेवनाळा ते निमगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठा नाला असून सदर नाल्यावर ...
०४ लोक १३ के
भंडारा : लाखनी तालुक्यातील जेवनाळा ते निमगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठा नाला असून सदर नाल्यावर पूल नसल्याने शेतकरी तसेच प्रवासी नागरिकांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या यंत्रणेने दखल घेऊन सदर रस्त्यावरील नाल्यावर पूल तयार करण्यासाठी पर्याप्त प्रमाणात निधीची तरतूद करून मार्च एंडिंग संपण्यापूर्वी तत्काळ पूल तयार करण्याची तसदी घ्यावी, मात्र याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीमशक्ती संघटनेने निवेदनातून दिला आहे.
जेवनाळा येथील शेतकरी बांधवांची शेतजमीन सदर रस्त्यावरील नाल्याच्या पलीकडे असल्यामुळे शेतकरी शेतमजूर बांधवांना नाला ओलांडून जावे लागते. तसेच निमगाव येथील विद्यार्थ्यांना विद्यार्जन करण्यासाठी दररोज ये-जा करावी लागते. परंतु पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नाल्याला पूर आल्यास रहदारी बंद असते. शेतकरी, शेतमजूर शेतावर तसेच विद्यार्थी शाळेत गेल्यास त्यांना या समस्यमुळे घरी कसे परतावे, असा प्रश्न आवासून उभा ठाकत असतो. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर पुराच्या पाण्यात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरील नाल्यावर पूल तयार करण्यासाठी सबंधित विभागातर्फे मागील वर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात सर्व्हे करण्यासाठी प्रत्यक्ष मोक्याच्या ठिकाणी आले होते परंतु माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. आजतागायत पुलाचे बांधकाम करण्यास सुरुवात झाली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून लाखनी तालुक्यातील जेवनाळा ते निमगाव रस्ता नाल्यावर तत्काळ पूल तयार करण्याची मागणी आहे. निवेदनात प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, अंबादास नागदेवे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, हरिदास घरडे, निकाराम शेंडे, सुरेश गेडाम, गंगाराम काणेकर, अविनाश बोरकर, मोरेश्वर लेंढारे, नथ्यू सूर्यवंशी यांनी एका निवेदनातून दिला आहे.