पाटबंधारे विभागाची इमारत पाडली
By admin | Published: April 8, 2016 12:27 AM2016-04-08T00:27:24+5:302016-04-08T00:27:24+5:30
चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभरणीच्या कामात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून पाटबंधारे विभागाची कर्मचाऱ्यांच्या ८ खोल्याची वसाहत
पोलिसात तक्रार दाखल : कंत्राटदार अडचणीत येण्याची शक्यता
चुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभरणीच्या कामात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून पाटबंधारे विभागाची कर्मचाऱ्यांच्या ८ खोल्याची वसाहत आरोग्य विभाग व कंत्राटदाराने मंजुरीविना भुईसपाट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या संदर्भात पाटबंधारे विभागाने सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याशिवाय आरोग्य विभाग व कंत्राटदारानेच पाठबंधारे विभागाची इमारत भुईसपाट केली आहे, असे करित असताना इमारत पाडण्याची मंजुरी पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आली नाही, असा ठपका या विभागाने ठेवला आहे. याप्रकरणात जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आमनेसामने आले आहे. दोन्ही विभागांनी तक्रारीचा पाठपुरावा सुरू केल्याने कलंगीतुरा सुरू झाला आहे. चुल्हाड येथे आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. या केंद्रासाठी ही इमारत अडचणीचे ठरत आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी चुल्हाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सिहोऱ्यातून आणला. झुडपी जंगलाचा वादासह अन्य अडचणी निकाली काढण्यात जिल्हा परिषद सदस्य प्रतिक्षा कटरे यांनी प्रयत्न केले. गावात ७ कोटी रूपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचाऱ्याचे वसाहत बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य विभाग अंतर्गत निविदा काढण्यात आले असून साकुरे नामक कंत्राटदाराला इमारतीचे कंत्राट देण्यात आले आहे. (वार्ताहर)
डावा कालवा अंतर्गत पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी वसाहत बांधकाम करण्यात आली होती..ही इमारत परवानगी व नाहरकत मंजुरी न घेता पाडण्यात आली असून शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
- एस.एन. वाईन्देशकर,
शाखा अभियंत, सिहोरा.
पाटबंधारे विभागाची इमारत भुईसपाट करण्यात आल्याची तक्रार आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान असल्याने कारणावरून प्रत्येक बाबीचा तपास केला जात आहे. चौकशी अंती यात दोषीविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
- राजेंद्र शेटे,
पोलीस निरीक्षक सिहोरा.