अतिक्रमणावर पुन्हा बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 09:51 PM2018-08-31T21:51:51+5:302018-08-31T21:52:26+5:30
शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमण बाबतीत शुक्रवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमण बाबतीत शुक्रवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ करण्यात आली.
त्रिमूर्ती चौक ते शास्त्री चौक तथा शहराील अन्य मार्गावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात यावेळी पालिका किंवा बांधकाम खात्याने नोटीस न बजावता दवंडीव्दारे अतिक्रमण हटविण्याचे सूचना दिली होती. यात विशेष म्हणजे रस्त्याच्या दुर्तफा थाटलेल्या दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढायला सुरूवात होती. पर्यायी व्यवस्था न करता दरवेळी होत असलेल्या कारवाईमुळे फुटपाथ दुकादारांमध्ये कमालीचा असंतोष दिसून आला.
गत तीन वर्षात जवळपास तीनवेळा शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबविण्यात आली. मात्र त्यानंतर स्थिती जैसे थे अशीच आहे. स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनानेही पर्यायी व्यवस्थेबाबत अजुनपर्यंत ठोस पाऊले उचललेली नाहीत. पर्यायी जागेबाबत फक्त सुचना व सल्ला देण्याची मानसीकता प्रशासनाने ठेवल्याने फुटपाथ दुकानदारांमध्येही कमालीचा असंतोष व्याप्त आहे.
व्यवसाय हिरावल्याने रोष
अतिक्रमण काढण्यापूर्वी फुटपाथ दुकानदारांची पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन फुटपाथ शिवसेना संघटनेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले होते. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी १५ फेब्रुवारी २०१८ ला नगर पालिका प्रशासनाला पत्र बजावून पर्यायी व्यवस्थेसाठी सूचना दिली होती. मात्र, पालिकेने त्या पत्रावर अजुनपर्यंत दखल घेतलेली नाही. फुटपाथ दुकानदारांची नोंदणीकरीता पालिकेने २१० रूपये घेवून पावतीही दिली. तसेच प्रतिदिन १० रूपये रोज करवसुलीही सुद्धा घेण्यात येते. त्याउलट शुक्रावरी सरळ कारवाई करून फुटपाथ दुकानदारांचा व्यवसाय हिसकावून घेण्यात आला, असा आरोप फुटपाथ शिवसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अख्तर बेग मिर्झा यांनी केला आहे.
पार्किंगला तिलांजली
भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या वर पोहचली आहे. वाढत्या नागरीकरणाच्या माध्यमातून शहराची व्याप्तीही वाढू लागली. शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यामानाने व्यापारी प्रतिष्ठानेही झपाट्याने वाढली. विशेष म्हणजे पार्किंग व्यवस्था नसलेल्या भंडारा शहरात अतिक्रमणाने गंभीर रूप प्राप्त केले. मागील दोन दशकांपासून रस्त्याच्या कडेला फेरीवाले तथा लघु व्यवसायिकांनी दुकान थाटले आहेत. शहरातील मुख्य रस्ता आधीच अरूंद असताना त्याातही वाढत्या अतिक्रमणाने समस्येत भर घातली. मात्र पर्यायी व्यवस्थेबाबत प्रशासनानेही पुढाकार घेतला नाही. परिणामी शहरात पार्किंग व्यवस्थेला तिलांजली देण्यात आली आहे.
नियमाप्रमाणे सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. मात्र शहरात दवंडी देवून अतिक्रमण काढण्याची सूचना देण्यात आली होती. पोलिस दलाचे सहकार्य मिळाल्याने संयुक्तपणे अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात जवळपास ३००च्या जवळपास अतिक्रमण काढण्यात आले.
-ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, नगर पालिका, भंडारा