सुरक्षेचे दंडुके पेलवणाऱ्या हातात स्वच्छतेसाठी झाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 10:08 PM2019-02-10T22:08:54+5:302019-02-10T22:09:41+5:30
सुरक्षा व सुव्यवस्थाची जबाबदारी पोलिसांवर असते. हातात दंडुके व जबादारी दिलेल्या भागात शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस विभागाची दमछाक नेहमी पाहायला मिळते. कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी गावातील गुन्हेगारी साफ करणाऱ्या पोलिसांच्या हातात परिसर स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू दिसले.
तथागत मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : सुरक्षा व सुव्यवस्थाची जबाबदारी पोलिसांवर असते. हातात दंडुके व जबादारी दिलेल्या भागात शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस विभागाची दमछाक नेहमी पाहायला मिळते. कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी गावातील गुन्हेगारी साफ करणाऱ्या पोलिसांच्या हातात परिसर स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू दिसले. खाकी वर्दी दिसली की अनेकांना घाम फुटतो पण ही खाकी वर्दी स्वच्छता मोहीम राबवताना झळकली. गुन्हेगारी सफाई प्रमाणे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वरठी पोलिसांनी घेतलेले पुढाकार चर्चेचा तेवढाच आकर्षणाचा विषय आहे.
वरठी येथील जगनाडे चौकातील जैन मंदिर परिसरात पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाणे भाड्याच्या घरात असून त्या समोरील भागात जागेची वाणवा आहे. पार्कींगची सोय नाही. पोलीस ठाणे समोरील भागात असलेल्या खुल्या जागेत घाण व कचरा पडून होता. वरठी-भंडारा मार्गावर असलेल्या पोलीस ठाणेला जाणाºया वळण मार्गावरील रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा आहे. त्या भागात कचरा वाढल्याने पोलीस ठाणेचे 'लुक' जनावरांच्या गोठ्यासारखे दिसत होते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण होते. परिसरात पसरलेली घाण व कचरा लक्षात घेऊन नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक एस.बी. ताजने यांनी स्वच्छता मोहीम हातात घेतली. पोलीस ठाणे समोरील जागेत सपाटीकरण करून व्यायाम व खेळण्यासाठी मैदान तयार केले. रस्त्याच्या कडेला उगवलेले कचरा व घाण स्वच्छ करण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, हवालदार सचिन गभने, छाया मेश्राम, भारती टेकाम, राकेश बोरकर, कुंदन फुलबांधे, त्रिमूर्ती लांडगे, संदीप बनते व नंदकिशोर मारबते यांनी स्वत: हातात फावडे व झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. या भागात राहणारे पंचायत समिती माजी सदस्य रवी येळणे यांना माहिती मिळताच तेही हातात फावडा घेऊन सहभागी झाले. पोलीस ठाणे व रस्त्याच्या पलीकडचे संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आले.
पोलिसांना कामाचा प्रचंड ताण असतो. २४ तास अलर्ट रहावे लागते. कधी कोणती घटना घडणार आणि कुठं धावत जावे लागणार याचा नेम नाही. यामुळे या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळ राखून स्वत: ला सज्ज ठेवावे लागते. आॅन ड्युटी त्यांना खूप कमी वेळ आरामासाठी मिळतो. वेळप्रसंगी येणाऱ्या आवाहनाला तयार ठेवण्यासाठी सवड मिळाल्यावर रिलॅक्स ठेवणे आवश्यक असते. अशा रिकाम्या वेळचा सदुपयोग पोलिसांनी स्वच्छता मोहिमेकरिता राखून ठेवला आहे. गत अनेक दिवसांपासून सवड मिळताच स्वच्छता मोहीम फत्ते करण्यावर भर देतात. पोलीस ठाण्यासमोरील अख्खे परिसर त्यांनी स्वत: स्वच्छ करून खेळण्याचे मैदान तयार केले. यासोबत मुख्य मार्गावर असलेले कचरा आणि घाण साफ करून लगतच्या भागात वृक्षारोपण करण्याचे मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना रस्त्यावर साफसफाई करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या तर बघ्याची गर्दी जमली होती. स्वच्छेतेचा हा आदर्श नुसते बघ्याच्या स्वरूपात पाहून गावात चर्चिल्या जाणार की यापासून बोध घेऊन प्रत्येकजण ही जबाबदारी म्हणून ही योजना अमलात आणेल हा यक्ष प्रश्न आहे. स्वच्छता हि एकाची नाही तर संपूर्ण गावातील नागरिकांची जबाबदारी आहे.