भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या 'बंटी- बबली'ला रायपुरात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 08:18 PM2022-06-10T20:18:37+5:302022-06-10T20:21:16+5:30

शेअर्स मार्केटमधून चांगला परतावा देतो असे आश्वासन देत पुण्यातील नागरिकांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या कापगते दांपत्याला पुणे पोलिसांनी रायपूर येथून ताब्यात घेतले. 

'Bunty-Babli' from Sakoli in Bhandara district arrested in Raipur | भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या 'बंटी- बबली'ला रायपुरात अटक

भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या 'बंटी- बबली'ला रायपुरात अटक

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे पोलिसांची कारवाईफसवणूक प्रकरणात अनेक दिवसांपासून होते फरार

भंडारा : शेअर्स मार्केटमधून चांगला परतावा देतो असे आश्वासन देत पुण्यातील नागरिकांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या कापगते दांपत्याला पुणे पोलिसांनी रायपूर येथून ताब्यात घेतले. 

हिंदी सिनेमातील ‘बंटी-बबली’ या जोडीने अनेकांना ज्याप्रकारे गंडवून फसविण्याचा प्रकार चालविला होता. प्रत्यक्ष तशाच प्रकारे शेअर्स मार्केटमधून चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवित बंटी आणि बबलीने आधी साकोली व त्यानंतर पुणे येथील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला. फरार झालेल्या साकोली तालुक्यातील डॉ. नाशिक कापगते व त्याची पत्नी आशा कापगते या बंटी-बबलीच्या जोडीला अखेर पुणे पोलिसांनी रायपूर येथून शुक्रवारी अटक केली.

या जोडीने पुणे येथे जाण्याअगोदर साकोली परिसरातील अनेकांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांनी गंडविल्यानंतर फरार झाले होते. त्यानंतर त्यांनी आपले बस्तान पुणे शहरात मांडले. २०१७ पासून पुणेकरांना शेअर्स मार्केटमध्ये दामदुप्पट परतावा देतो म्हणून फसवणुकीचा धंदा सुरू केला. पुण्यात फसलेल्या गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार अलंकार पोलीस स्टेशन, पुणे येथे दाखल केली होती. नऊ महिन्यांपासून पुणे पोलीस मागावर होते.

अनेकांना लावले देशोधडीला

डाॅ. नाशिक कापगते याने २०१७ पूर्वी साकोली परिसरातील अनेक जणांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले. अनेकांनी घामाचे पैसे यांच्या स्वाधीन केले. सुरुवातीला नियमितपणे परतावा दिल्यामुळे लोकांचा विश्वास बसला. नंतर पुराव्यांअभावी तक्रारदारांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नव्हती. २०१७ मध्ये साकोली पोलीस स्टेशनला काही लोक फसवणुकीच्या तक्रारी घेऊन गेले होते. मात्र, पुरावे नसल्याने तक्रारी दाखल झाल्या नाहीत. चेक बाऊन्सचे प्रकरण गुन्हे विभागांतर्गत येत नसल्याने सरळ कोर्टात गेले. तिथून संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर अनेकदा नोटीस पाठविण्यात आली. मात्र, डाॅ. नाशिक कापगते पत्त्यावर राहत नसल्याने नोटीस कोणीही न स्वीकारल्याने काही वर्षांनंतर कोर्टाने हे प्रकरण खारीज केले होते.

या जोडीने चारही जिल्ह्यांतील शेकडो लोकांची जवळपास २५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकीच्या प्रकरणाची तक्रार घेऊन आम्ही २०१७ मध्ये साकोली पोलीस स्टेशन येथे गेलो होतो. मात्र, पुरावे नसल्याने तक्रार दाखल करण्यात आली नाही. आमच्या घामाचे पैसे परत मिळाले पाहिजेत. या बंटी-बबलीला कडक शिक्षा झाली पाहिजे.

- संजय समरीत, एकोडी, ता. साकोली.

या प्रकरणाचा साकोली पोलीस स्टेशनशी काहीही संबंध नाही. फसवणूक प्रकरणी अद्याप आमच्याकडे कुठलीही तक्रार नोंदविलेली नाही.

- जितेंद्र बोरकर, पोलीस निरीक्षक, साकोली.

Web Title: 'Bunty-Babli' from Sakoli in Bhandara district arrested in Raipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.