विद्यार्थ्यांच्या खांद्यावर दप्तराचे अन् डोक्यावर धान्याचे ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:50+5:302021-03-05T04:34:50+5:30
: विद्यार्थ्यांना थेट धान्याचे वाटप रंजीत चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह ...
: विद्यार्थ्यांना थेट धान्याचे वाटप
रंजीत चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन बंद करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येत असून आता खांद्यावर दप्तर अन् डोक्यावर धान्याचे ओझे अशी अवस्था ग्रामीण विद्यार्थ्यांची झाली आहे. सिहोरा परिसरात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिहोरा येथे ग्रामीण विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सायकल आणि एसटी बसने प्रवास करतात. या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन वितरणाची सोय प्रत्येक शाळेत करण्यात आली आहे. दर्जेदार मध्यान्ह भोजन दिले जात असल्याने विद्यार्थी आनंदित आहेत. परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रसाराने मध्यान्ह भोजनाचे गणित बिघडले आहे. शाळा सुरु करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असली तरी नियमांचे बंधन आहे. नियमांच्या अधीन राहून शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिहोरा गावात शैक्षणिक संस्था अनेक आहेत. प्रत्येक शाळेत ५०० पेक्षा अधिक पटसंख्या आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सोय शाळा करीत आहे. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मध्यान्ह भोजन वितरण बंद करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना तांदूळ, चनादाळ वाटप केले जात आहे. शाळेत येताना विद्यार्थी दप्तराचे ओझे घेऊन येत आहेत. घरी परत जातांना दुहेरी ओझे वाहून नेत आहेत. खांद्यावर दप्तराचे ओझे अन् डोक्यावर धान्याचे थैले नेण्याची पाळी या विद्यार्थ्यांवर आली आहे.
शाळेतून बसस्थानकापर्यंत येताना विद्यार्थ्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक दप्तर आणि धान्याचे वजन अधिक असल्याचे निदर्शनास येत आहेत. शालेय प्रशासन नियमांचे पालन करीत आहेत. विद्यार्थ्यांचे हक्काचे अन्न धान्य वितरित करीत आहेत. परंतु लांब गावात धान्याचे ओझे डोक्यावर नेताना विद्यार्थ्यांची कसरत होत आहे. बसमध्ये गर्दीत विद्यार्थ्यांची धान्य सांभाळताना धांदल उडत आहे.
बॉक्स
मानव विकासच्या सायकल वाटप नाही
दरवर्षी मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात येत होते. यंदा या सायकली वाटपाचे नियोजन असल्याचे दिसून येत नाही. मार्च महिना आला असताना शासन, प्रशासनाचे सायकल वाटपाचे नियोजन ठरले नाही. विद्यार्थी सायकल वाटपाची विचारणा करीत आहेत. यामुळे डोक्याला ताप असल्यागत अवस्था मुख्याध्यापकाची झाली आहे. सावित्रीच्या लेकीचा पायदळ प्रवास सुरु झाला आहे.
कोट
विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे धान्य वितरित करण्यात येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहेत. यंदा सायकल प्राप्त झालेल्या नसल्याने विद्यार्थिनी विचारणा करीत आहेत.
ओ. बी. गायधने
प्राचार्य, जिल्हा परिषद हायस्कूल, सिहोरा