दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:35 AM2021-04-21T04:35:20+5:302021-04-21T04:35:20+5:30
भंडारा : दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होत्या. मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या ...
भंडारा : दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होत्या. मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होणार आहेत. मात्र शिक्षण मंडळाने परीक्षेची तयारी करुन कोऱ्या उत्तरपत्रिका संबंधित जिल्ह्यांच्या कस्टडीत पाठविल्या होत्या. आता या उत्तरपत्रिका मुख्याध्यापकांच्या जबाबदारीत असल्याने टेंशन अधिकच बळावले आहे. भंडारा जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या १८ हजार ११० तर बारावीचे १५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला बसणार आहेत. कोरोना परिस्थितीमुळे तब्बल एक महिना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तयारी अंतर्गत बोर्डाने उत्तरपत्रिका व अन्य साहित्य संबंधित जिल्ह्यात पाठविले. आता हेच साहित्य सुरक्षिततेच्या दृष्टीने डोईजड ठरल्याचेही दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात कस्टडीयन म्हणून भंडारा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची निवड करण्यात आली.
परीक्षा कधी? पुढील प्रवेश कधी?
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या व जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. मात्र यात विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन शैक्षणिक करिअरवर परिणाम होऊ नये याची काळजी शिक्षण विभागाने घेतली आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर निकालाचे टेंशन राहणार आहे. त्यासोबतच पुढील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी ऑगस्ट महिना प्राथमिकदृष्ट्या गृहित धरण्यात आल्याची माहिती आहे. मात्र कोरोना परिस्थिती पाहता यात बदल होईल काय अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मुख्याध्यापक म्हणतात....
तब्बल एक महिना परीक्षा समोर ढकलल्याने नियोजनही थोडेफार विस्कटले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने नियोजन आखून काम करावे लागणार आहे.
-गौरीशंकर सलामे, सावरला
कोरोना स्थितीमुळे दहावी व बारावीच्या परीक्षा लांबल्या आहेत. विद्यार्थ्यांची कसोटी पणाला लागली आहे. त्यातच मुख्याध्यापकांचे ही टेंशन वाढले आहे.
-सुनील घोल्लर, फुलमोगरा
शहरातील ऐतिहासिक शाळा असलेली लालबहादूर शाळेत कोविड सेंटर आहे. त्यातच आता कस्टडीयनची जबाबदारी अंतर्गत परीक्षेच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व अन्य साहित्य आहेत. वेळीच कोरोना स्थितीमुळे विविध साहित्याची मागणी केली जाते. अशा स्थितीत शिक्षकांचीही नियुक्ती व अन्य कामांमुळे टेंशन अधिकच बळावले आहे. शास्त्री विद्यालयाचे परीक्षा केंद्रही अन्य ठिकाणी नेण्यात येईल अशी प्राथमिक माहिती आहे.
-केशर बोकडे, मुख्याध्यापिका, लालबहादूर विद्यालय, भंडारा.
हे साहित्य कस्टडीत
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरु होणार आहेत. दहावी - बारावीचे विद्यार्थी एकत्रित केल्यास आकडा ३४ हजारांच्या वर जातो. अशा स्थितीत कोऱ्या उत्तरपत्रिकांचा ढीग शाळेत ठेवण्यात आला आहे.
अन्य साहित्यांमध्ये पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राफ्टर, स्टीकर, एबी लिस्ट, विषयनिहाय व माध्यम निहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदी बोर्डाकडून प्राप्त झाले आहेत. या साहित्यांची सुरक्षितता व काळजी घ्यायची आहे.
विद्यार्थ्यांची परीक्षाच
नियोजनाप्रमाणे एप्रिल महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा होणार होत्या. मात्र कोरोना रुग्णांच्या उद्रेकामुळे परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आल्या. आधीच शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाईन होतील अशी घोषणा केली होती. यात कुठलाही बदल सध्यातरी झालेला नाही. एप्रिल महिन्याच्या परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी सुरु केली होती. वेळेवर परीक्षा समोर ढकलण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला. पेपर देऊन एकदाचे टेंशन फ्री व्हावे असे विद्यार्थ्यांना वाटते. मात्र कोरोनामुळे परीक्षाच लांबणीवर गेल्याने विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जोमाने अभ्यासाला लागायचे आहे. आधी तयारी नंतर नियोजन विस्कटल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची परीक्षाच देण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाच्या काहिलीत या परीक्षा होणार आहेत.