बस-मिनी ट्रक अपघातात चालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:07 PM2017-08-16T23:07:44+5:302017-08-16T23:08:14+5:30
खापा चौकात वळणावर विरुद्ध दिशेने येणाºया एसटी व दुधाची वाहतूक करणाºया मिनी ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : खापा चौकात वळणावर विरुद्ध दिशेने येणाºया एसटी व दुधाची वाहतूक करणाºया मिनी ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने बसमधील सर्वच प्रवासी बचावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला.
बस व मिनी ट्रक यांच्यात झालेल्या टक्करनंतर मिनी ट्रक हा झाडावर आदळला. तुमसरहून रामटेक कडे जाणाºया बस क्रमांक एम.एच. ४० - ८६२१ व रामटेकहून तुमसरकडे दुधाची वाहतूक करणारा मिनी ट्रक क्रमांक एम.एच. ३१ सी.क्यु. ८८१५ खापा चौकातील वळणावर मिनी ट्रक बसवर आदळला. बस वळणाहून रामटेक मार्गे जात होती. बसचालकाने वाहन वाचविण्याचा प्रयत्न केला. यात बसचा समोरील भाग मिनी ट्रकला घासून गेल्याने ट्रक अनियंत्रीत होऊन वळणावरील वडाच्या झाडावर आदळला. यात ट्रकच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. मिनी ट्रकचा चालक या अपघातात गंभीररित्या जखमी झाला. त्याचे नाव कळू शकले नाही. बस प्रवाशांनी भरलेली होती. अपघाताची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक घटनास्थळी उपस्थित झाले. बसमधील प्रवाशांना दुसºया बसने रवाना करण्यात आले.
मिनी ट्रक हा तुमसर कृषी उत्पन्नबाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे यांच्या मालकीचा असल्याची चर्चा खापा चौकात सुरु होती. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी भेट घेत संबंधितांना निर्देश दिले. खापा चौकात जुने वडाचे झाड आहे. वडाचे झाड वळणमार्गावर असून झाडाच्या पारंब्या लोंबकळत आहेत. यामुळे रामटेक मार्गावर वाहन वळण घेत असताना विरुद्ध दिशेकडील काहीच दिसत नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खापा चौकात वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांची उपस्थिती राहत असली तरी वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने येथे अनेकदा अपघात घडले आहेत.
विशेष म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण राज्य मार्ग असलेल्या या खापा चौकात सिग्नलची व्यवस्था होणे अत्यंत गरजेचे आहे. भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्याला जोडणारा चौक म्हणूनही याकडे बघितले जाते. मात्र अपघाताला अनेकदा निमंत्रण मिळूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही, हीच खरी शोकांतिका आहे.