बसस्थानकात प्रवाशांचे खड्यांच्या गचक्याने होते स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 09:53 PM2019-03-24T21:53:11+5:302019-03-24T21:54:02+5:30
जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानकात बस प्रवेश करताच प्रवाशांचे स्वागत खड्याच्या दचक्याने होते. खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानकात बस प्रवेश करताच प्रवाशांचे स्वागत खड्याच्या दचक्याने होते. खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत.
जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. जिल्हयाचे मुख्यालय असल्याने अनौपचारिकपणे बसस्थानकाचे क्षेत्रफळ मोठे असणे स्वाभाविक आहे. बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्य मार्ग आहे. दक्षिण दिशेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल व जलतरण तलावाचा परिसर आहे.
पूर्व दिशेला झोपडपट्टीचा परिसर आहे. नविन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुना बसस्थानकाच्या परिसरातून मोठ्या बाजारात जाण्यासाठी एक लहान गल्ली होती. याच गल्लीतून मोठा बाजार परिसरातून येणारे प्रवासी आजही येतात. मात्र या परिसरात दुर्गंधी आहे. कचरा अस्तव्यस्त फेकलेला दिसून येतो.
बसस्थानक आवारालगत व्यापारी संकुलाची भव्य इमारत आहे. त्यामुळे जुन्या बसस्थानकाचा भाग खुला असला तरी दाबल्या गेला आहे. शेळ्या, कुत्रे व अन्य बेवारस जनावरे येथे फिरत असतात. बसस्थानकाच्या आवरात खुलेआम लघुशंकेसाठी करण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळेही दुर्गंधीत वाढ झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य प्रमाणात नालीचे बांधकाम नाही. उघड्यावरच लघूशंका केली जात असल्याने येथून जाणाऱ्या प्रवाशांना तोंडावर रुमालच घेवून जावे लागते. काही दिवसांपूर्वी या भागातील अतिक्रमण काढण्यात आले मात्र स्थिती ‘जैसे थे’ आहे.
बसस्थानक परिसराला लागून असलेल्या इमारती व अन्य दूकानांमधील कचरा कचरापेटीत न घालता तो थेट जुन्या बसस्थानक परिसरात फेकला जातो. विशेष म्हणजे बसस्थानक परिसरातील डांबरीकरण उखडले असल्याने या समस्येत अजून भर पडली आहे. गिट्टी उखडलेली असल्याने बसच्या चाकाखाली सापडून गिट्टी केव्हा प्रवाश्यांच्या अंगावर येईल याचा नेम नाही. मध्यंतरी आगार प्रशासनाने भरण घालून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशव्दारावरील रस्त्याची वर्षातून अनेकदा डागडूजी करण्यात येते.
प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
बसस्थानकात प्रवाशांची नेहमी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकदा 'हात की सफाई' केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. मात्र त्यांची समस्या सोडविण्यात पोलीसांना यश नाही. येथील पोलीस चौकी नेहमीच कुलुपबंद अवस्थेत दिसून येते. मात्र त्याची साधी चौकशी केली जात नसल्याचे समजते. दहा दिवसांपूर्वी पालांदुरातील एका महिला प्रवाशाला एक लक्ष रूपये किंमतीच्या दागिण्यांना मुकावे लागल होते. पोलिस चौकशी कक्ष कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो.
पे्रमीयुगुलांचे थांबे
जिल्हा मुख्यालयी असलेल्या बसस्थानकात दररोज येणाऱ्यांची संख्या हजारावर आहे. याठिकाणी बहुतांश युवायुवतींचे जत्थे दिसून येतात. शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. बसस्थानक जणू प्रेमीयुगलांचे थांबे असल्याचे तेथील हालचालीवरुन समजते.