अड्याळ येथील बसथांबा अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:59+5:302021-01-02T04:28:59+5:30
: येथील बसथांबा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली होती. यासाठी गावातील ग्रामस्थांनी, युवकांनी मोठी मेहनत घेऊन व ...
: येथील बसथांबा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली होती. यासाठी गावातील ग्रामस्थांनी, युवकांनी मोठी मेहनत घेऊन व वर्गणी गोळा करून या बसथांबा परिसराचा कायापालट केला होता. प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला होता, पण आज पुन्हा हा बसथांबा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने प्रवाशांचा प्रवास धोक्यात आला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष जात नाही का, निष्पाप लोकांचे बळी गेल्यावर जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामवासीय विचारत आहेत.
या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा नेहमीच गर्दी पाहायला मिळते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अड्याळ हे शिक्षणाचे मुख्य ठिकाण असल्याने येथे विद्यार्जनासाठी रोज हजारो विद्यार्थी येतात. शाळेला सुट्टी होते त्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठलेही अतिक्रमण एकावेळी होत नाही. ते हळुवार होते. हे सर्वांना माहीत असले तरी त्याचा परिणाम मात्र एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. ग्रामपंचायत प्रशासन असो वा पोलीस प्रशासन यांनी लक्ष केंद्रित करायचे नाही, तर मग कुणी करायचे. अड्याळ बसथांबा परिसराची सध्याची स्थिती एवढी बिकट आहे की, प्रवाशांना बसायची सोडाच, पण उभे राहायलासुद्धा परिपूर्ण जागाच मिळत नाहीत. हे जर दिसत नसेल तर मग यांना दिसते तरी काय, असाही संतप्त सवाल यावेळी उपस्थित होतो आहे.
ज्यावेळेस येथील अतिक्रमण हटवले होते तेव्हा समस्त परिसर स्वच्छ व मोकळा झाला होता, पण आज परिस्थिती आधीपेक्षा बिकट होण्यामागे जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन की पोलीस प्रशासन. परिस्थिती या बसथांबा परिसराची असो वा गावातील मुख्य रस्त्यावरची वा पोलीस स्टेशन हद्दीतील अवस्था बिकट होत चालली आहे, पण याकडे आता गंभीरपणे दखल घेण्याची नितांत गरज असूनसुद्धा याकडे दुर्लक्ष का? जीव गेल्यावर सांत्वन करण्यासाठी जाण्यापेक्षा आपल्या अधिकाराचा वापर करून ग्रामस्थ असो वा प्रवाशांना त्या होणाऱ्या त्रासदायक ठिकाणाला लाभदायक बनविण्यासाठी आता कोणते प्रशासन पुढे येते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
बसथांबा परिसरातील दुतर्फा सध्या महामार्ग बांधकाम विभागाचे नाल्याचे बांधकाम सुरू आहे. खोदकामात निघालेली माती अनेक दिवस जिथल्या तिथं पडून राहते. यामुळेसुद्धा प्रवाशांना त्रासच त्रास सहन करावाा लागतो. एकंदरीत या ठिकाणी येणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच यावे लागते. कोण कुठला वाहनचालक भरधाव वेगाने येणार आणि कधी कुणाचा अपघात होणार याचीही शाश्वती आज मात्र राहिली नाही. तरी येथील ग्रामपंचायत तथा पोलीस प्रशासन तत्काळ कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. प्रवाशांना बसायला जागा नाही आणि त्याच ठिकाणी लहान, मोठी दुचाकी चारचाकी वाहने उभी राहतात.