‘मिनरल’ वॉटरचा व्यवसाय तेजीत
By Admin | Published: May 26, 2015 12:37 AM2015-05-26T00:37:22+5:302015-05-26T00:37:22+5:30
उन्हाची काहिली वाढली की सगळीकडे पाणीटंचाई निर्माण होते. उन्हाळ्यात फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी ..
विविध कंपन्या स्पर्धेत उत्पादनावर निर्मितीची तारीख दिसणे झाले दुर्लभ
तुमसर : उन्हाची काहिली वाढली की सगळीकडे पाणीटंचाई निर्माण होते. उन्हाळ्यात फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेऊन पिण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याचा उद्योग चांगलाच फोफावला आहे. तथापि अनेक ‘लोकल’ कंपन्या पिशवी अथवा बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ करताना दिसून येतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पूर्वी कुणालाही तहान लागली की नळावर किंवा पाणपोईवर जाऊन तहान भाविली जायची. त्यावेळी पाणपोर्इंची संख्याही जादा होती. अनेक सेवाभावी संस्था दरवर्षी उन्हाळ्यात हमखास पाणपोइर्ट सुरू करायच्या. आता मात्र पाणपोर्इंची संख्या प्रचंड घटली आहे. परिणामी पाणपोई अथवा नळावर जाऊन पाणी पिणाऱ्यांंची संख्याही हळूहळू कमी होत आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गियांना आता बाटलीबंद पाण्याचा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे या पाण्याची विक्री प्रचंड तेजीत आहे.
सध्या एक लीटर पाण्याच्या बाटलीची किंमत २0 रूपये आहे. सोबतच पाणी पाऊचही बाजारात येत आहे. त्याची किरकोळ विक्रीची किंमत किमान तीन रूपये आहे. गेली काही वर्षे शीतपेय तयार करणाऱ्या नामांकित कंपन्या आता बाटलीबंद पाण्याची विक्री करू लागल्या आहे. प्रवासात मोठ्या प्रमाणात मिनरल वॉटरचा वापर होत असल्याने प्रत्येक स्थानकावर वेगवेगळ्या स्थानिक कंपन्यांच्या बॉटल सहज मिळत आहे. मिनरल वॉटरचा वाढता वापर लक्षात घेऊन काही बनावट कंपन्याही बाजारात आल्या आहेत. वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून ते थंड करून मिनरल वॉटर म्हणून विकण्यात येत आहे. त्यावर कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. ग्रामीण भागात तर उन्हाळ्यात बऱ्याच उपहारगृहात चहा घेतला तरच पाणी मिळेल, अशी टोकाची भूमिका घेण्यात येते. त्यामुळे सवर्सामान्यांना पाणी मिळत नाही. शेवटी वैतागून विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागते. (तालुका प्रतिनिधी)
उत्पादनाची तारीख टाकणे बंधनकारक
कोणत्याही पॅकबंद वस्तूवर निर्मिती आणि ती वस्तू संपुष्टात येण्याची तारीख टाकणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. संबंधित वस्तू कोणत्या तारखेला उत्पादित करण्यात आली, ती किती दिवस व्यवस्थित राहणार आहे, त्याची अंतिम मुदत कधी संपणार आहे, याबाबत त्या वस्तूच्या वेष्टनावर सर्व बाबी नमूद करणे आवश्यक असते. मात्र अनेक कंपन्या पाण्याची बाटली अथवा पाऊचवर निर्मितीची तारीखच टाकत नाही. त्यामुळे ती बाटली अथवा पाऊच किती दिवस व्यवस्थित राहू शकते, याबाबत ग्राहकाला काहीच कळत नाही. केवळ थंड पाणी मिळते म्हणून ग्राहकही ते बिनभोभाटपणे खरेदी करून गिळंकृत करतात. मात्र त्यांचेच आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
परवान्याची तपासणी करण्याची गरज
बाटलीबंद व पाऊचव्दारे पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. मात्र अनेकदा कोणताही परवाना न काढताच काही जण त्याची निर्मिती करतात. त्यामुळे सर्व पाणी विकणाऱ्यांचा परवाना तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. सोबतच त्या पाण्यातील विविध घटकांची तपासणी करणे गरजेचे आहे. भंडारा शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी केवळ पाणी थंड करूनच ते विकले जात आहे. त्यात कोणते घटक आहे, कोणते घटक नाहीत, याबाबत सामान्य ग्राहकांना माहितीही नसते. केवळ थंड पाणी मिळते म्हणून ते बाटली अथवा पाऊच घेऊन तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न करतात. ते पाणी आरोग्यास हितकारक आहे की घातक, याचा कुणीही विचारच करीत नाही. त्यामुळे बनावट पाणी विक्रीचा समांतर व्यवसायही फोफावत आहे.