दारू विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Published: June 17, 2017 12:17 AM2017-06-17T00:17:48+5:302017-06-17T00:17:48+5:30

देशीदारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील रॅकेटचा पर्दाफाश करण्यात भंडारा जिल्हा पोलिसांना शुक्रवारी यश आले.

Busted racket selling liquor | दारू विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

दारू विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Next

२.९३ लाखांचे साहित्य जप्त : पाच जणांना अटक, चंद्रपूर जिल्ह्यातील इसमांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशीदारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील रॅकेटचा पर्दाफाश करण्यात भंडारा जिल्हा पोलिसांना शुक्रवारी यश आले. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तथा वाचक शाखेच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन लक्ष ९३ हजार ५४ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पवनी तालुक्यातील बाह्मणी परिसरात काही इसम अवैधरीत्या देशी दारूची पेट्यांमधून वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेला मिळाली.
खबऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन काल मध्यरात्रीच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या चारचाकी क्रमांक एम एच ३१ ए एच ०२६७ या वाहनाला ताब्यात घेण्यात आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या.
यावेळी पोलिसांनी गाडीचालक वैभव संभाजी कोरे (२४) रा. मेंढा ता. नागभिड, रंजीत राजकुमार खोब्रागडे रा. मोहाडी ता. नागभिड, अजय रेखचंद अलोणे रा. मोहाडी ता. नागभिड व श्रीनिवास कोलावार रा. पवनी याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यात वाहनांमधून देशीदारूच्या आठ पेट्या अन्य कंपनीच्या नावे असलेल्या २७ पेट्या व १८७ पव्वे जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या एकूण साहित्यांची किंमत २ लक्ष ९३ हजार ५४ रुपये सांगण्यात येते. सर्व पाचही जणांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात आयात व निर्यात होत असल्याची माहिती होती. मागील काही दिवसातही पोलिसांनी कारवाई करुन दारू विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. यात चंद्रपूर जिल्ह्यातील रॅकेटचा समावेश असल्याचीही गोपनीय माहिती भंडारा पोलीस प्रशासनाकडे मिळाली. याच आधारावर उपरोक्त कारवाई करण्यात आली.
सदर कारवाही जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. वाकडे, पोलीस हवालदार रवी फुलसुंगे, पोलीस नायक दिनु मते, महेश कडव, मुकेश पांडेकर, पोलीस शिपाई लोकेश पोटवार व आरसीपी पथक, पोलीस नियंत्रण कक्ष यांच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान दारूची अवैध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या संदर्भात जिल्हा पोलिसांचा तपास सुरु आहे.

अवैध रेती वाहतूक; ११ जणांविरुद्ध कारवाई
पवनी : तालुक्यातील सर्वच रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध खनन व ओवरलोड वाहतूक केल्या जाते. चोरीची रेती वाहतूक करण्यास सहकार्य करण्यासाठी राज्य मार्गावर दुतर्फा मोठ्या संख्येने महागडे वाहन उभे करून वाहतुकीत अडचण निर्माण करणाऱ्या ११ इसमाविरूद्ध एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. निलतारा हॉटेल जवळील उजव्या कालव्याजवळ शेख अक्रम शेख लाल मोहम्मद (४९) रा. खरबी, नागपूर. पारस हॉटेल जवळ राहूल अशोक स्वामी (२४) रा. पटेल टावर बेसा रोड, नागपूर. रोषन कृष्णराव हजारे (२८)रा. दिघोरी, नागपूर. विशाल दिलीपराव चौधरी (३०) रा.पिंपळफाटा, नागपूर. ताडेश्वर वार्ड पवनी जवळ निखील प्रकाश साठवने (२६) रा.सूर्या नगर नागपूर. दिनेश कवडू चाचेकर (२६) रा. चंपा जि. नागपूर. निलेश हिरामण आंबाडारे (३०) रा. कच्छीमेट जि. नागपूर. मनोज राजेंद्र भुरे (२१) रा. गौतम वार्ड पवनी. नवीन बसस्थानक पवनी जवळ रबुल खान नयमुल खान (३६) रा. बाबा फरीद नगर नागपूर. एनाजुल खान तजमुल खान (३०) रा. जिजामाता नगर नागपूर. आसीर खान हबीब खान (२६) रा. रोशन बाग खरबी नाका नागपूर या सर्व ११ इसमाविरूद्ध पो.हवालदार कवडू कटारे यांचे तक्रारीवरून कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात
पवनी : दुचाकी चोरणारा चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई पवनी पोलिसांनी काल केली. मिळालेल्या माहितीनुसार तुमसर येथील रहिवासी असलेल्या संदीप खंगार यांची दुचाकी क्रमांक एम एच ३६/ ११८६ ही शासकीय रुग्णालय पवनी येथून चोरी करण्यात आली होती. पवनी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सुनील ताजणे यांच्या नेतृत्वात व खबऱ्यांच्या माध्यमातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांवर नजर ठेवण्यात आली. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे सापडा रचून प्रविण उर्फ चकमक वल्द पुंडलिक बहादुरे रा. सालेबर्डी जिल्हा नागपूर याला अटक करण्यात आली. पोलीसी हिसका दाखविताच बहादूरे याने दूचाकी चोरल्याचा गुन्हा कबूल केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल ताजणे, पोलीस हवालदार सुभाष मस्के, भरत ढाकणे, अनिल कळपते व पोलीस शिपाई खुशांत कोचे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: Busted racket selling liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.