अनुदानाचे तुकडे पाडून संगणक खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:00 AM2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:01:22+5:30

भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी शासनाकडून २०१८-१९ मध्ये अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ३० मार्च २०१९ च्या पत्रान्वये कार्यालयीन आकस्मिक खर्चांतर्गत संगणक या उपशिर्षात १६ लाख ५० हजार रुपये ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अनुदान वितरीत केले.

Buy a computer by tearing down the grant | अनुदानाचे तुकडे पाडून संगणक खरेदी

अनुदानाचे तुकडे पाडून संगणक खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्दे३४ लाखांचा निधी : आरोग्य विभागातील प्रकार, सीईओंच्या मान्यतेशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी

ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी शासनाकडून प्राप्त ३४ लाख ३६ हजार रुपयांच्या अनुदानाचे तुकडे पाडून खरेदी करण्यात आली असून अनुदान वितरणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही मान्यता घेण्यात आली नसल्याचे दिसत आहे. यातून प्रत्येक आरोग्य केंद्राने ५० हजार रुपये किमतीचे संगणक आणि प्रिंटर खरेदी केले. मात्र यासाठी त्यांनी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस (जीईएम) प्रणालीद्वारे खरेदी न करता दरपत्रके मागवून खरेदी केली. त्यातही सर्वच्या सर्व संगणकांची किंमत सारखीच दिसून येत आहे. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी शासनाकडून २०१८-१९ मध्ये अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ३० मार्च २०१९ च्या पत्रान्वये कार्यालयीन आकस्मिक खर्चांतर्गत संगणक या उपशिर्षात १६ लाख ५० हजार रुपये ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अनुदान वितरीत केले. विशेष म्हणजे सदर अनुदान वितरीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक होते. परंतु तसे न करता थेट निधी प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आला.
त्यात मुख्य लेखाशिर्ष २२१०, वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य उपलेखाशिर्ष जिल्हा आरोग्य संघटनेंतर्गत धारगाव, पहेला, देव्हाडी, गोबरवाही, कोंढा, पोहरा, सरांडी आणि बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संगणकासाठी चार लाखांचे अनुदान वितरीत केले तर उप लेखाशिर्ष मुफसल दवाखाने अंतर्गत चुल्हाड, दिघोरी आणि पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना १ लाख ५० हजार रुपये तर उपलेखाशिर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ११ लाख रुपयांचा निधी वितरीत केला. या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जीईएम प्रणालीद्वारे निविदा मागवून संगणक खरेदी करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता दरपत्रक मागवून खरेदी केली. सदर खरेदी भंडारा शहरातील संगणक विक्रेत्यांकडून करण्यात आली. विशेष बाब म्हणजे प्रत्येक आरोग्य केंद्राने ५० हजार रुपयातच संगणक आणि प्रिंटर खरेदी केले. संगणकाची किंमत ३४ हजार ४५० रुपये आणि प्रिंटरची किंमत १४ हजार ४८० रुपये दर्शविण्यात आली. प्रत्येक आरोग्य केंद्राने याच किमतीने संगणक खरेदी केल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. आता चौकशीत काय पुढे येते याकडे लक्ष लागले आहे.

संगणक व प्रिंटरची खरेदी भंडारा शहरातून
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळालेल्या ५० हजार रुपयांच्या निधीतून संगणक खरेदी करण्यात आले. बहुतांश आरोग्य केंद्रांनी संगणक आणि प्रिंटर्सची खरेदी भंडारा शहरातील विविध संगणक विक्रेत्यांकडून केली आहे. विशेष म्हणजे यासाठी जीईएम प्रणालीचा वापर न करता थेट दरपत्रके मागवून खरेदी केली आणि सर्वांचे दरही सारखे असल्याचे दिसत आहे. सर्व संगणक एकाच कंपनीचे असून प्रिंटर मात्र वेगवेगळ्या कंपनीचे आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या तक्रारीवरून चौकशी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राप्त अनुदानातून संगणक खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावरून या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी करीत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुरवठादारांकडून निविदा बोलावूनच खरेदी करणे गरजेचे होते आणि सर्व प्रक्रिया जिल्हा स्तरावरच राबविण्याची गरज असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. आता चौकशी अहवालात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य विभागातील संगणक खरेदीबाबत आपण तक्रार केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पदभार काढण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही घेण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. उलट आपल्याला पत्र पाठवून कोरोना संसर्गामुळे पदभार तुर्तास काढणे यथोचित ठरणार नाही असे सांगितले. अधिकाºयांची एकाधिकारशाही खपवून घेतली जाणार नाही. प्रभार काढला नाही तर आपणच जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसू.
-रमेश डोंगरे, जिल्हा परिषद अध्यक्ष, भंडारा.

नियमित प्रक्रियेअंतर्गत आरोग्य केंद्रांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. संगणकांची खरेदी मी केली नाही. त्यामुळे याबाबत मी काय सांगणार? संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आपल्या स्तरावर संगणकाची खरेदी केली आहे.
-डॉ.प्रशांत उईके,
जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.

Web Title: Buy a computer by tearing down the grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य