भंडारा खनिकर्म पथकाची पांजरा रेती घाटावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:24 AM2021-07-11T04:24:21+5:302021-07-11T04:24:21+5:30
तुमसर: तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रेती घाटाचा लिलाव नसताना मागील अनेक दिवसांपासून सर्वांत जास्त रेतीची चोरी सुरू आहे. भंडारा ...
तुमसर: तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रेती घाटाचा लिलाव नसताना मागील अनेक दिवसांपासून सर्वांत जास्त रेतीची चोरी सुरू आहे. भंडारा येथील खनिकर्म पथकाने शनिवारी सकाळी धडक दिली. दरम्यान, रेती घाटातील १३ ट्रॅक्टरचालकांनी रेती रिकामी करून पसार झाले. सदर १३ ट्रॅक्टरचालकांविरुद्ध सिहोरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रेती तस्करांत एकच खळबळ माजली आहे.
पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदीपात्रात गुणवत्तापूर्ण रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मागील काही दिवसांपासून रेती तस्करांनी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. याबाबत भंडारा येथील खनिकर्म विभागाला माहिती मिळाली. त्या आधारावर खनिकर्म विभागाच्या पथकाने पांजरा येथील घाटावर शनिवारी धडक दिली. रेती तस्करांनी ट्रॅक्टरमधील रेती रिकामी करून धूम ठोकली. खनिकर्म विभागाच्या पथकात कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे त्यांना पकडण्यात यश आले नाही. या घाटात समूहाने रेतीचे उत्खनन करण्यात येते. नदीपात्रात रेती उत्खनन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. अचानक धडक दिलेल्या पथकामुळे येथे तस्करांची भंबेरी उडाली.
रेती तस्करांनी कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टरमधील रेती रिकामी केली व ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. परंतु खनिकर्म विभागाच्या पथकाने ट्रॅक्टरच्या संख्येसह सविस्तर माहिती तुमसर तहसीलदारांना दिली. तहसीलदारांच्या निर्देशानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात तेरा ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भा.दं.वि. ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉक्स
महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह:
राज्याच्या महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत नदीपात्रातील रेती चोरीप्रकरणी संबंधित गावातील तलाठी यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तुमसर तालुक्यातील पांजरा सोंड्या माडगी येथे मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे. सदर रेती घाट खनिकर्म विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू असताना महसूल प्रशासनाने कारवाई केल्याचे दिसत नाही, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तालुक्यात अर्थकारणाची चर्चा सुरू आहे. तालुक्यातील रेती घाट सुरक्षित नाहीत, त्यामुळे पर्यावरणासह महसुलाचे मोठे नुकसान होत आहे.