नाल्यातील झुडुपात बिबट्यासह बछड्यांचा ठिय्या; वनविभाग सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 02:04 PM2022-02-19T14:04:45+5:302022-02-19T14:21:33+5:30
खैरी / पट गावालगतच्या झुडुपात दडून असलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी परिसरातच एका माकडाची शिकार करून झुडुपात ठिय्या मांडला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली.
लाखांदूर (भंडारा) : शिकारीच्या शोधात जंगलातून भटकलेल्या एका बिबट्यासह दोन बछड्यांनी गावालगतच्या शेतशिवारात प्रवेश करून माकडाची शिकार करीत नाल्यातील झुडुपात ठिय्या मांडल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील खैरी/पट गावालगतच्या नाल्याजवळ उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास स्थानिक खैरी/पट येथील एक व्यक्ती गावालगतच्या नाल्याजवळ शौचास गेला होता. यावेळी संबंधित व्यक्तीला नाल्या लगतच्या झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसून आले. त्याने याबाबत स्थानिक नागरिकांसह लाखांदूर वनविभागाला माहिती दिली.
परिसरात बिबट्यासह दोन बछडे असल्याची माहिती नागरिकांना होताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली होती. तर, काहीजण नाला परिसरातीलच काही घरांच्या छतावरून बिबट व त्याचे दोन बछडे पाहताना दिसून आले. दरम्यान, स्थानिक वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून गस्त सुरू केली आहे. बिबट्या व बछड्यांच्या सुरक्षिततेसह अन्या दुर्घटना टाळण्याहेतू वन व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर असलेली नागरिकांची गर्दी कमी केली.
दरम्यान, शिकारीच्या शोधात गत ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक खैरी/पट शेतशिवारात प्रवेश केलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी शुभम भागडकर नामक शेतकऱ्याच्या झोपडीत प्रवेश करून ३४ कोंबड्यांसह एका श्वानाची शिकार केली होती. या घटनेला केवळ १० दिवस लोटत नाही तोच दुसऱ्यांदा बिबट्यासह दोन बछडे खैरी/पट गावाजवळील नाल्यालगतच्या झुडुपात असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांत बिबट्याची दहशत दिसून येत आहे.
बाभळीच्या झाडावरून वनमजुराची गस्त
नाल्यालगतच्या झुडुपात बिबट्यासह दोन बछड्यांनी ठिय्या मांडल्याने त्यांच्याकडून होणारी अन्य दुर्घटना टाळण्याहेतु वन व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गस्त केली जात आहे. यावेळी विकास भुते नामक वनमजूर नाला परिसरातीलच बाभळीच्या झाडावर चढून गस्त करताना दिसून आला.