संच मान्यतेसाठी आधारकार्डची अट रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:28+5:302021-09-16T04:43:28+5:30
भंडारा - संच मान्यतेसाठी विद्यार्थ्याच्या आधार कार्डाची सक्तीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी भंडारा तालुका मुख्याध्यापक ...
भंडारा - संच मान्यतेसाठी विद्यार्थ्याच्या आधार कार्डाची सक्तीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी भंडारा तालुका मुख्याध्यापक संघाने केली आहे.
भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत अपर मुख्य सचिव, आयुक्त (शिक्षण), शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना अध्यक्ष प्रदीप मुटकुरे, सचिव सुनील गोल्लर, राधेश्याम धोटे, अनमोल देशंपाडे, कुंदा गोडबोले़, हरीराम लांजेवार, सुनील गांगरेड्डीवार, संजीव कुकडे, पी. बी. कळंबे आदी उपस्थित होते. इयत्ता १ ली ते १२ वीमधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम शाळांच्या व्यवस्थापनांनी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीचे काम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करावे असे सुचविले आहे.
तसेच यापुढे संच मान्यतामध्ये केवळ आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार असल्याचे पत्रात नमूद आहे. शासनाने अध्यादेश काढून माध्यमिक शाळांमध्ये संचमान्यता करीत असताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सक्तीचे केले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार अपलोड केले नसतील, त्या विद्यार्थ्यांना संच मान्यतेमध्ये गृहीत धरू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होतील. संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्डचा निर्णय रद्द करण्यात यावा.
शिक्षण संचालक यांच्या पत्रानुसार कार्यवाही झाली तर शिक्षकांवर संकट येईल. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करणे अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी उपलब्ध होतील. शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. शाळांचे नुकसान होईल. एकीकडे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे दाखला न देता शाळांमध्ये प्रवेश द्या असे शासन म्हणते आणि दुसरीकडे त्याला आधार कार्ड सक्ती करण्यात येत आहेत. वास्तविक आधार कार्ड काढणे हे विद्यार्थ्यांची व पालकांची जबाबदारी आहे. त्यामुळे संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अट रद्द करण्यात यावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे.