तीन वर्षात कर्करोगाने ८९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2016 12:31 AM2016-02-04T00:31:35+5:302016-02-04T00:31:35+5:30
कर्करोग आजारासंबंधी नाव उच्चारले तरी अंगावर शहारे येतात. कर्करोग आजारासंबंधी जनजागृती होत असली तरी भंडारा जिल्ह्यात गत तीन वर्षामध्ये या आजाराने ...
आज जागतिक कर्करोग दिन : जिल्ह्यात ३८३ रुग्ण बाधित
देवानंद नंदेश्वर भंडारा
कर्करोग आजारासंबंधी नाव उच्चारले तरी अंगावर शहारे येतात. कर्करोग आजारासंबंधी जनजागृती होत असली तरी भंडारा जिल्ह्यात गत तीन वर्षामध्ये या आजाराने ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्ये ४४ पुरुष तर ४५ महिलांचा समावेश आहे. तीन वर्षामध्ये ३८३ रुग्ण कर्करोगाने बाधीत असल्याचे उघडकीस आले.
दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कर्करोगाविषयी अजूनही बऱ्याच गैरसमजूती आहेत. त्यामुळे कर्करोगासंबंधी जनजागृती कार्यक्रमात अडचणी येत असतात. आरोग्यदायी वर्तणूक, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास आरोग्य संस्थेत जाऊन निदान करून घेणे याविषयी जनमानसात जागरुकता दिसत नाही. आरोग्यदायी आहार, शारीरिक व्यायाम, काम व योग्य वजन राखल्यास १/३ कर्करोगापासून दूर राहता येऊ शकते.
जगातील २० ते ४० टक्के किशोरवयीन लठ्ठपणाने ग्रासले आहेत. जास्त वजन व लठ्ठपणा यामुळे आतडे, स्तन, गर्भाशय, बीज कोष, स्वादुपिंड, अन्ननलिका, किडनी, पित्ताशय या अवयवांच्या कर्करोगाचा धोका वाढल्याचे अभ्यासाअंती लक्षात आले आहे. मद्यपानामुळे विविध कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
भंडारा जिल्ह्यातील तीन वर्षातील कर्करोग तपासणी अहवाल लक्षात घेतला असता १ हजार ५५६ रुग्णांची कर्करोग आजाराची तपासणी करण्यात आली आहे. यात ६१ रुग्णांना गर्भाशयाचा कर्करोग, ९५ जणांना स्तनाचा कर्करोग आहे. स्तनाच्या कर्करोगात ९४ महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. ८४ रुग्णांना तोंडाचा कर्करोग आहे. यात ५७ पुरुष तर २७ महिलांचा समावेश आहे.
इतर कर्करोगामध्ये १६३ रुग्णांना आजार बळावला आहे. यात ११९ पुरुष व ४४ महिलांचा समावेश आहे. एकुण ३८३ कर्करोगाचे रुग्ण आढळले असून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आजारावर आळा घालण्यासाठी जनजागरण तसेच निदान व उपचाराचे काम केले जात आहे.
कर्करोग रुग्णांच्या निदानासाठी भंडारा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर व साकोली तसेच ग्रामीण रुग्णालय पवनी व लाखांदूर येथे कर्करोग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये १४० संशयित कर्करोग रुग्ण शोधून काढण्यात आलेले आहेत.
या रुग्णांच्या जिल्हा रुग्णालयात तपासणी करून त्यातून ६९ कर्करोगाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी ३२ रुग्णांची किमोथेरेपीसाठी निवड करण्यात आलेली आहे. उर्वरीत सर्व रुग्णांना रेडीओथेरेपीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालय नागपूर येथे संदर्भीय करण्यात आलेले आहे. स्तन कर्करोगाची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय भंडारा येथे केली जात असून मागील तीन वर्षात ८ शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.