उमेदवारांची लढत उन्हाशीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:58 PM2019-03-29T22:58:48+5:302019-03-29T22:59:11+5:30
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. सध्या पारा ४० अंशावर पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भातील सात मतदार संघात पहिल्या टप्यात मतदान होत असून प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांची पहिली लढत उन्हाशी होत आहे. वाढत्या उन्हाचे चटके नेते आणि कार्यकर्त्यांना बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. सध्या पारा ४० अंशावर पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भातील सात मतदार संघात पहिल्या टप्यात मतदान होत असून प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांची पहिली लढत उन्हाशी होत आहे. वाढत्या उन्हाचे चटके नेते आणि कार्यकर्त्यांना बसत आहे.
विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर आणि यवतमाळ, वाशिम मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली आहे. गावागावातील मतदारापर्यंत पोहचण्याची उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धडपड सुरू आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे त्यात अडथडा येत आहे. कायम वातानुकूलीत वाहनात फिरणारे नेते आणि कार्यकर्ते अक्षरक्ष: घामाघूम होत आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तसाही विदर्भाचा उन्हाळा कडकच असतो. गत आठवड्यापासून कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे असल्याचे दिसत आहे. सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ नोंदविली जात आहे. राज्यात उष्णतेची लाट आली असून त्यात आणखी भर पडणार आहे.
उमेदवार आणि कार्यकर्ते वातानुकूलीत वाहनातून गावात पोहचत असले तरी तेथे लोकांमध्ये मिसळण्यासाठी खाली उतरावेच लागते. त्यावेळी अंगाची लाहीलाही होते. उन्हात फिरण्याची सवय नसलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांची प्रकृतीही बिघडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान मतदारांच्या प्रश्नांसोबतच उन्हाच्या तडाक्याचा सामनाही उमेदवाराला करावा लागत आहे.
भंडारा-गोंदियाचा पारा ४१ अंशावर, सकाळपासून चटके
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे शुक्रवारी तापमान ४१ अंश सेल्सिअस होते. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागतात. यामुळे प्रचार यंत्रणा दुपारी सुस्तावते.
वातानुकूलीत वाहनात फिरणाऱ्या नेत्यांची उन्हाने चांगलीच त्रेधा उडत आहे. वाहनातून खाली उतरल्यापासून चेहºयावरील घामच टिपावा लागतो.
दुपारी प्रचारासाठी गावात गेलेल्या नेते, कार्यकर्त्यांना मतदार भेटत नाही. उन्हात सभा आणि बैठका घेणेही शक्य नाही. त्यामुळे सकाळी व सायंकाळी प्रचारावर भर देतात.
उन्हात फिरण्याची सवय नसलेल्या नेते, कार्यकर्त्यांना आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते. पाणी आणि खाद्य पदार्थाची काळजी घेताना मोठी कसरत होते. गावात गेल्यावर सोबतचे मिनरल वॉटर प्यालास मतदारांचा गैरसमज होवू शकतो. त्यामुळे गावकऱ्यांनी दिलेलेच पाणी आणि खाद्य पदार्थ घेतल्याशिवाय प्रचार दौºयामध्ये पर्याय नसतो.