उमेदवारांना द्यावी लागणार आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:23 AM2024-11-07T11:23:26+5:302024-11-07T11:26:47+5:30
Bhandara : प्रसारमाध्यमातून द्यावी लागणार तीन वेळा जाहिरात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे सर्व उमेदवारांना आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मतदारांना द्यावी लागणार आहे. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, याची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांमध्ये द्यावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबरला जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकामध्ये यासंदर्भातील निर्देश विस्तृतपणे प्रसिद्ध केले आहे. भंडारा जिल्ह्यातील उमेदवारी जाहीर केलेल्या सर्वांनी याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबरला जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकामध्ये यासंदर्भातील निर्देश विस्तृतपणे प्रसिद्ध केले आहे. भंडारा जिल्ह्यातील उमेदवारी जाहीर केलेल्या सर्वांनी याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर मतदान होईपर्यंत ही माहिती जाहीर करणे अनिवार्य केले आहे. मतदारांना माहिती होईल, अशा प्रकारे प्रसारमाध्यमामधून तीन वेळा जाहिराती देऊन जनतेला माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या काळात तीन वेळा वृत्तपत्रांतून आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातील माहिती प्रकाशित करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे करणाऱ्या राजकीय पक्षाने सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती संकेतस्थळ, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून तीन वेळा प्रसिद्ध करणेदेखील आवश्यक आहे.
कारवाईत १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त
१५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यात या तारखेपासून जिल्हा प्रशासनाच्या पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी १० लाख ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात भंडारा मतदारसंघात ३६ हजार ५९८ लीटर दारू हस्तगत करण्यात आली. तसेच साकोली विधानसभा क्षेत्रात १२ हजार २१३ लीटर तर तुमसर विधानसभा क्षेत्रात ३९ हजार १३६ लीटर दारू जप्त करण्यात आली. याची किंमत ८२ लाख ३८ हजार रुपये सांगण्यात येते. तर अन्य साहित्य मिळून २८ लाख १० हजार रुपये जप्त केले.