गांज्याची तस्करी अन् तरुणाईला व्यसनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:56+5:302021-06-26T04:24:56+5:30
भंडारा : कुठलेही व्यसन शरीरासाठी घातक आहे. ही बाब समजूनही दुर्लक्ष करून व्यसनाकडे आकर्षित होणाऱ्या तरुणाईला तारण्याची गरज ...
भंडारा : कुठलेही व्यसन शरीरासाठी घातक आहे. ही बाब समजूनही दुर्लक्ष करून व्यसनाकडे आकर्षित होणाऱ्या तरुणाईला तारण्याची गरज आहे. भंडारा जिल्ह्यात गुटखा, सुगंधित सुपारी याची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून, आता गांजाच्या तस्करीतून तरुणाईला व्यसनाचा विळखा घातला आहे. २६ जून रोजी दरवर्षी जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व्यसनाच्या आहारी जाणाऱ्यांचे समुपदेशन करणे नितांत गरजेचे आहे. किंबहुना ही प्रक्रिया सातत्याने राबविणे महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील व्यसनाबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यात ग्रामीण क्षेत्रात व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जिल्ह्यात महिलांचे प्रमाण व्यसनांमध्ये २० टक्के सहभाग आहे. त्यातच जिल्ह्यातील ६०.७ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करीत असल्याचेही वास्तव सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
तंबाखू सहज उपलब्ध होणारा नशेचा प्रकार आहे. विडी आणि सिगारेटच्या माध्यमातून तंबाखूचे सेवन केले जाते. एकदा लागलेले तंबाखू व अमली पदार्थाचे सेवन सहसा सुटत नाही. सुटत असले तरी मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची व मनावर संयमाची गरज सते.
भंडारा जिल्ह्यातील ६० टक्के पुरुष आणि २० टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. या आशयाची बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आली होती. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तंबाखूचे सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे. प्राचीन काळापासूनच तंबाखूचे सेवन केले जाते.
निकाटीआना टॅबकम असे तंबाखू चे शास्त्रीय नाव आहे. अल्कलाइड या गटात मोडणारे निकोटिन हे द्रव्य तंबाखूच्या मुळामध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपट्यातील जवळपास ६४ टक्के
निकोटिन पानांमध्ये असते. त्यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. जिल्हा ग्रामीण बहुल जिल्हा आहे.
तंबाखूचे सेवन करण्याची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. पंधरा वर्षांवरील पुरुषांचे प्रमाण ६० टक्के, तर याच वयोगटातील महिलांचे प्रमाण १९.७ टक्के आहे. विशेष म्हणजे आता तंबाखूचे सेवनासोबत गांजाचे सेवनही वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरुणांमध्ये खर्रा खाण्याचे प्रमाण अधिक असले तरी आता त्यांचे लक्ष गांजाच्या सेवनाकडे जात आहे. ही तेवढीच गांभीर्य आणि विचारात टाकणारी बाब आहे.
बॉक्स
तंबाखूमुक्त अभियान राबविण्याची गरज
भंडारा जिल्ह्यात विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले होते.
मात्र गत वर्षभरापासून शाळा बंद आहे. अशावेळी हे अभियान प्रभावीपणे राबविले गेले नाही.
आता ग्रामीण भागासह शहरी भागातील मुले ही गुटखा व गांजाच्या सेवनाकडे वळल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सदर अभियान पुन्हा एकदा जोमाने राबविण्याची गरज आहे. त्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा
प्रभावीपणे राबवावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोट बॉक्स
व्यसन हे जन्मजात लागत नाही, मात्र संगतीचा परिणाम आणि परिस्थिती त्याकडे नेते. बालके वयात आल्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन लाभणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाही तर त्यांची पावले संगतीमुळे व्यसनाकडे वळत असते. जिल्ह्यात गांजा कुठून व कसा येतो, याबाबतही पोलीस प्रशासनाने गांभीर्याने तपास करून त्याचा मूळ नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच आपली येणारी भविष्यकालीन पिढी व्यसनमुक्त तथा सुसंस्कृत होऊ शकेल.
-डमदेव कहालकर, महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्कार प्राप्त, खराशी, ता. लाखनी